दुरुस्तीच्या कामांमुळे जड वाहनांना प्रवेशबंदी
ठाणे : ठाण्याचा घोडबंदर रोडवर उद्या (ता. ७) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. जोडून सुट्ट्या आणि रविवार असल्याने प्रवासासाठी बाहेर पडलेल्यांचे हाल होणार आहेत. हा रस्ता मुंबईतील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे व वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडतो. मीरा-भाईंदर पालिकेने फाउंटन हॉटेल ते काजुपाडा दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम जाहीर केले आहे.
ठाणे वाहतूक पोलिसांनी सांगितले की हे काम सलग २४ तास सुरू राहणार असून या मार्गावर जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. हलक्या वाहनांना मात्र मार्ग मोकळा असेल, पण दुरुस्तीच्या ठिकाणाला वळसा घालण्यासाठी त्यांना समोरच्या (विरुद्ध दिशेच्या) मार्गांचा वापर करावा लागेल.
संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता, अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रवासाची पूर्वतयारी करण्याचे, जास्तीचा वेळ हाती राखून बाहेर पडण्याचे आणि शक्य असल्यास गर्दीच्या वेळा टाळण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक रहिवासी आणि दररोज प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई व ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनांना माजिवडा व्हीवाय जंक्शन आणि कापुरबावडी चौक येथे प्रवेश निर्बंध आहे. अशा वाहनांना खारेगाव टोल नाका, मानकोली, अंजूरफाटा किंवा कशेळीमार्गे वळवले जाईल आणि त्यानंतर अंजूरफाट्याकडे मार्गक्रमण करू शकतील.
मुंबईहून मुंब्रा बायपासमार्गे मुंबई-नाशिक महामार्गावरून येणाऱ्या जड वाहनांनाही खारेगाव टोल नाक्यावर निर्बंध आहेत. त्यांना खारेगाव टोल नाका–मानकोली–अंजूरफाटा या मार्गाने वळवले जाणार आहे. नाशिककडून घोडबंदरकडे येणारी वाहने मानकोली येथे थांबवून मानकोली अंडरब्रिजमार्गे अंजूरफाटा मार्गावर वळवली जातील. घोडबंदरकडे जाणारी हलकी वाहने दुरुस्ती क्षेत्रातून समोरच्या लेनचा वापर करून पुढे जाऊ शकतील; मात्र वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
घोडबंदर हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता मानला जातो. दररोज अनेक हलकी आणि अवजड वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. यंदा या रस्त्यावर वारंवार खड्डे पडत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेने चार वेळा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले होते. वाहतुकीत केलेल्या बदलामुळे नागरिकांना भीषण वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. या कोंडीमुळे एका लहान मुलाला आपला जीवही गमवावा लागला होता. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील या वाहतुकीतील बदलामुळे पुन्हा अशी समस्या उद्भवण्याची भीती नागरीक व्यक्त करत आहेत.






