२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट
नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले व्यापारी संबंध अधिक दृढमूल करण्यासाठी पुतिन यांचा दौरा लाभकारी ठरणार आहे. पुतिन यांच्या भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातल्या विविध क्षेत्रातल्या सहकार्याविषयीचे मोठे करार होणार आहेत. यामध्ये औषध निर्मिती, वाहन निर्मिती, कृषी उत्पादने, त्याचबरोबर सागरी वाहतूक उत्पादने यांचाही समावेश असून भारताला यानिमित्ताने रशियन बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.
खाद्यान्न, औषधे, दैनंदिन वापराच्या वस्तूंची रशिया मोठ्या प्रमाणावर आयात करते. तिथे भारताला बरीच व्यवसाय संधी असून, २०३० पर्यंत निर्यात ३५ अब्ज डॉलरवर नेता येऊ शकते, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने (जीटीआरआय) म्हटले आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर आले आहेत. यात दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याचा निश्चय करण्यात आला. दोन्ही देशांनी २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या भारत आणि रशियातील द्विपक्षीय व्यापार ७० अब्ज डॉलर आहे. त्यातील भारताची निर्यात अवघी ५ अब्ज डॉलर आहे, तर भारताच्या आयातीत कच्च्या तेलाचा वाटा सर्वाधिक आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताने रशियाला ४.९ अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात केली असून, ६३.८ अब्ज डॉलरची आयात केली आहे. भारताची रशियाशी असलेली व्यापारी तूट तब्बल ५८.९ अब्ज डॉलर आहे. या द्विपक्षीय व्यापारात कच्च्या तेलाचा वाटा ५०.३ अब्ज डॉलर इतका प्रचंड आहे. दोन्ही देशांमध्ये प्रमुख व्यापार हा केवळ इंधन असल्याचे दिसून येते. रशिया आयात करीत असलेल्या बऱ्याच क्षेत्रात भारताची लक्षणीय निर्यात आहे. रशियाच्या आयातीतील अशी मर्मस्थळे शोधून निर्यातविस्तार करता येईल, असे जीटीआरआयच्या अहवालात म्हटले आहे. कृषी क्षेत्राला भरपूर वाव!
रशिया दरवर्षी २०२.६ अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात करते. त्यातील अवघा २.४ टक्के वाटा भारताचा आहे. रशिया १३ अब्ज डॉलरच्या कृषी उत्पादनांची आयात करते. त्यात फळे, तेल, मांस आणि दुग्धोत्पादनांचा समावेश आहे. त्यातील केवळ २५ कोटी डॉलरची बाजारपेठ भारताकडे आहे. कृषी क्षेत्र भारताचे बलस्थान आहे. त्यामुळे इथे बरीच व्यापार संधी आहे. रशिया सुगंधी द्रव्ये आणि आवश्यक तेलावर ३.१३ अब्ज डॉलर, तर साबण, कपडे धुण्याची पावडर यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या आयातीवर १.०७ अब्ज डॉलर खर्च करते. यातील अवघा तीन ते चार टक्के हिस्सा भारताकडे आहे.
याशिवाय कापड, कपडे आणि पादत्राणांच्या आयातीवर रशिया एक अब्ज डॉलर खर्च करते. यातील किरकोळ हिस्सा भारताकडे आहे. याशिवाय जगातील वाहनांचा प्रमुख उत्पादक असलेल्या भारताकडे रशियन वाहन बाजारपेठेचा नगण्य हिस्सा आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा औषध आणि औषधी घटकांचा निर्यातदार देश आहे. रशियाने २०२४ मध्ये ११.८ अब्ज डॉलरच्या औषधांची आयात केली आहे. त्यातील ४१.३५ कोटी डॉलरचा हिस्सा भारताचा आहे.






