कथा : रमेश तांबे
नमस्कार बाल मित्रांनो.
आज मी तुम्हाला इटलीतील एका प्रसिद्ध शिल्पकाराची गोष्ट सांगणार आहे. इटलीतील शिल्पकलेतील जाणकार अशा एका प्रसिद्ध नेत्याने शहरातील एका शिल्पशाळेला भेट दिली. ती शिल्पशाळा खरोखरीच भरपूर मोठी होती. तिथे अनेक प्रकारची मूर्ती शिल्पे, पुतळे बनवून ठेवले होते. स्त्री-पुरुषांची विविध प्रकारची शिल्पे तिथे ओळीने मांडली होती. मग त्या नेत्याने त्या शिल्पकाराची संपूर्ण कार्यशाळा अगदी मनःपूर्वक पाहिली. त्यानं पाहिलं की तो शिल्पकार एका भल्यामोठ्या पुतळ्यावर अगदी नजाकतीने आपली हत्यारे फिरवत होता. त्याने तो पुतळा मोठा सुबक बनवला होता. त्याच्या शिल्पकलेवर तो नेता बेहद्द खूश झाला.
ज्या पुतळ्यावर त्याचं काम चालू होतं, त्या पुतळ्याच्या बाजूलाच दुसरा एक पुतळा उभा होता. तो अगदी हुबेहुब तसाच होता. त्या नेत्याला वाटलं की या शिल्पकाराला नक्कीच दोन पुतळे बनवण्याचे काम मिळाले असणार, म्हणून तो दोन सारखेच पुतळे बनवत असावा. मग त्या नेत्याने शिल्पकाराला सहज विचारले, “काय रे बाबा, तुला हुबेहूब दोन पुतळे बनवण्याचं कंत्राट मिळाले आहे काय?” तसा शिल्पकार हसून म्हणाला, “नाही साहेब, तसं काही नाही. त्या पुतळ्यामध्ये थोडीशी चूक झाली म्हणून मी पुन्हा हा नवीन पुतळा बनवत आहे.” त्या नेत्याने पुन्हा एकदा बाजूच्या पुतळ्याकडे निरखून बघितलं, तर त्याला कुठेही, काहीही चूक दिसत नव्हती. तो नेता गंभीरपणे म्हणाला की, “मला तरी त्या पुतळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक दिसत नाही किंवा वेगळेपणाही जाणवत नाही. तरी पण तू नवीन पुतळा का बनवतो आहेस.” शिल्पकार पुन्हा हसला आणि म्हणाला, “साहेब तुम्ही एक काम करा. त्या ठिकाणी एक लाकडी शिडी आहे, ती शिडी घ्या आणि वर जाऊन बघा की त्या पुतळ्याच्या नाकावर एक लहानसा ओरखडा उमटला आहे. एक चरा पडलेला आहे आणि म्हणूनच मी नवीन पुतळा बनवत आहे.”
मग शिल्पकाराने सांगितल्याप्रमाणे नेत्याने ती लाकडी शिडी घेतली आणि त्यावर चढून तो पाहू लागला. त्याने काळजीपूर्वक पाहिलं, तर खरंच नाकावर एक बारीकसा ओरखडा उमटला होता. ते पाहून त्या नेत्याला हसूच फुटले. त्याने हसत हसतच शिल्पकाराला विचारलं, “काय रे, हा जो नवा पुतळा बनवतो आहेस तो शहरांमध्ये कुठे बसवणार आहेत.” शिल्पकार म्हणाला, “रोममधल्या एका प्रसिद्ध चौकामध्ये वीस फुटी चबुतऱ्यावर हा पंधरा फुटी पुतळा बसवणार आहेत. आता तो नेता आणखी जोरजोरात हसू लागला. अन् म्हणाला, “अरे वेड्या वीस फुटी चबुतरा आणि त्यावर हा पंधरा फुटी पुतळा! मग मला सांग एवढ्या उंचीवरचा ओरखडा कोणाला दिसणार आहे? कशाला तू उगाच कष्ट घेतो आहेस?” तोच शिल्पकार म्हणाला, “नाही साहेब, तो ओरखडा पुतळ्याच्या नाकावर नसून माझ्या हृदयावर पडलेला आहे आणि म्हणूनच मी पुन्हा हा नवीन पुतळा बनवत आहे. मी माझं काम करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतो. मन लावून, चांगलं आणि उत्कृष्ट काम करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. कामाच्या गुणवत्तेबाबत मी कधीच तडजोड करीत नाही.” शिल्पकाराचे बोलणे ऐकून त्या नेत्याने मोठ्या आदराने शिल्पकारापुढे हात जोडले अन् म्हणाला, “एक दिवस जग जिंकशील मित्रा!”
बालमित्रांनो, हाच शिल्पकार पुढे ‘मायकल अँजेलो’ या नावाने जगप्रसिद्ध झाला.






