नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की कमी वजन, कमी उंची व कुपोषण ही या मृत्यूंमागील प्रमुख कारणे असल्याचे नव्या अभ्यासात नमूद केले आहे. भारतात अशा प्रकारच्या १ लाखांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.
नायजेरियात बालवाढ अपयशाशी संबंधित १.९९ लाख बालमृत्यू नोंदले गेले असून ते जगात सर्वाधिक आहेत. त्याखालोखाल भारताचा दुसरा क्रमांक आहे. तिसऱ्या क्रमांकावर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोचा क्रमांक लागतो, जिथे पन्नास हजाराहून अधिक मृत्यू नोंदले गेले असल्याचे ‘द लॅन्सेट चाइल्ड अँड अडोलेसेंट हेल्थ’ जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षांमधून समोर आले आहे. वयानुरूप मुलांची वाढ न झाल्यास मुलांमध्ये मृत्यू आणि अपंगत्वाचा धोका अधिक वाढतो. श्वसनसंस्थेचे संसर्ग, अतिसार, मलेरिया आणि गोवर यांसारख्या आजारांमध्ये हा धोका अधिक असल्याचे संशोधकांनी सांगितले. या विश्लेषणासाठी २०२३ मधील ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीमधील डेटा वापरण्यात आला असून, जगातील २०४ देश आणि प्रदेशांमधील आजार, जखमा आणि विविध जोखमींमुळे झालेल्या आरोग्यहानीचे हे सर्वात अलीकडील मूल्यांकन आहे. अपुरे पोषण, अन्नसुरक्षेचा अभाव, हवामान बदल, स्वच्छतेची कमतरता किंवा युद्ध, असे ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी’चे सह-लेखक आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील प्रोफेसर बोबी रेनर यांनी सांगितले. म्हणूनच सर्व प्रदेशांमध्ये लागू होईल अशी एकच रणनीती या समस्येवर उपाय ठरू शकत नाही, ते पुढे म्हणाले. या वयोगटातील १२ टक्के मृत्यूंमागे कमी वजन हे प्रमुख कारण होते. दक्षिण आशियात आढळलेल्या आतड्यांच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ७९ टक्के, आणि श्वसन संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ५३ टक्के प्रकरणे ‘चाइल्ड ग्रोथ फेल्युअर’शी जोडलेली होती. कमी उंचीची चिन्हे जन्मानंतरच्या पहिल्या तीन महिन्यांतच दिसतात, यावरून गर्भधारणेआधी आणि गर्भावस्थेत हस्तक्षेपांची गरज अधोरेखित होते, असे संशोधकांनी सांगितले.






