मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल
मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा नसल्याचा फटका येथील विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांना खासगी शाळेची वाट धरावी लागत आहे. मात्र भरमसाठ शुल्क असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरिता शासकीय शाळेसाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. चेंबूर येथील भारतनगर परिसरातील माहुल गाव, गव्हाणपाडा, गडकरी खाण, विष्णूनगर, म्हाडा कॉलनी, अयोध्यानगर, शंकर देऊळ, आणिक गाव, मारवली गाव, रामनगर, कोंकणनगर, चेंबूर कॅम्प परिसरातील एकूण लोकसंख्या सहा ते आठ लाख आहे. भारतनगर, माहुल व अन्य परिसरात एमएमआरडीए वसाहत आणि झोपडपट्टी भागात बहुसंख्य मराठी भाषिक व कामगारवर्ग राहतो. या परिसरात खासगी इंग्रजी शाळा, आंतरराष्ट्रीय शाळा, पालिकेची पब्लिक शाळा आणि मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा आहेत; परंतु मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा नाही. त्यामुळे पालकवर्ग, विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पालकांना खासगी शाळेचे भरमसाठ शुल्क भरणे परवडत नाही. त्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर दूर असलेल्या चेंबूर नाका येथील पालिकेच्या मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळेचा आधार घ्यावा लागत आहे. या त्रासामुळे काही विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाला रामराम ठोकला आहे.
पालिका, एमएमआरडीए प्रशासन माहुल, वाशी नाका परिसरातील इमारतीत प्रकल्पग्रस्त रहिवाशांचे पुनर्वसन करते. मात्र लोकसंख्येनुसार कोणतीही सुविधा देत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. दुसरीकडे मात्र मराठी माध्यमाच्या शाळांची गळचेपी केली जात आहे, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या परिसरात माध्यमिक शाळा सुरू करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.






