Saturday, December 6, 2025

प्रयत्नवादाला स्वीकारा

प्रयत्नवादाला स्वीकारा

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर

केल्याने होत आहे रे। 
आधी केलेची पाहिजे।
यत्न तो देव जाणावा। 
अंतरी धरतां बरे।
अचूक यत्न तो देव। 
चुकणे दैत्य जाणिजे।
न्याय तो दैत्य जाणावा। 
अन्याये राक्षसी क्रिया॥
मी विवेकानंद म्हणतात, “ज्याचा  देवावर विश्वास नाही तो नास्तिक आहे असा आपला जुना धर्म सांगतो; परंतु धर्मविषयक नवीन व्याख्येनुसार ज्याचा स्वत:वर विश्वास नाही तोच नास्तिक होय... जगात ३३ कोटी देवांवर विश्वास नसेल तर काही हरकत नाही; पण जर स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही नास्तिकच आहात.”
मानवी जीवनाचे महान रहस्य स्वामीजींनी येथे सांगितले आहे. हीच गोष्ट समर्थांनी वरील ओव्यांत सांगितली आहे. ज्याला काम करायचे नसते तो आरंभापासून अनेक शंका-कुशंका काढतो आणि आळशासारखा पडून राहतो.
हेलन केलर ही जन्मत:च आंधळी, मुकी आणि बहिरी होती. केवळ स्पर्शाच्या सहाय्याने ती एम.ए.पर्यंत शिकली व आपल्यासारख्या बहिऱ्या, आंधळ्या  मुलींसाठी तिने शाळा सुरू केली. यशवंतराव चव्हाण अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले. त्यांना सर्व मुले ‘येशा’ म्हणत. त्यांना वाईट वाटे. एकदा वर्गात पर्यवेक्षक आले. त्यांनी प्रत्येक मुलाला एक प्रश्न विचारला,  तू मोठेपणी कोण होणार? जेव्हा यशवंताला हा प्रश्न विचारला तेव्हा हा मुलगा म्हणाला,-’ मि यशवंत राव चव्हाण होणार. ‘या मुलाने आयुष्यभर प्रयत्नवादाची कास धरली. अनेक महान गोष्टी केल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, लोकांसाठी आयुष्य वाहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, आपल्या प्रयत्नांनी, आपल्या प्रगतीची  दिशा ठरवली पाहिजे. ज्ञान मिळण्याचे साधन पुस्तकात मिळणार नाही. परिश्रम करून खऱ्या अर्थाने नीट समजण्याचे काम आहे. अशक्य काहीही नाही, हेच त्यांनी शिकवलं. मानवी जीवनात यश-अपयशाची वाटचाल अपरिहार्य आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संधी, संघर्ष, चढ-उतार येतच असतात; परंतु या सर्वांवर मात करण्याची खरी किल्ली एका तत्त्वात दडलेली आहे प्रयत्नवाद. म्हणजेच परिस्थिती कोणतीही असो, मनुष्याने सतत प्रयत्न करत राहणे, हार न मानणे आणि प्रगतीसाठी सकारात्मक धडपड करत राहणे.
१. प्रयत्नवाद का आवश्यक आहे?
प्रयत्न हा माणसाच्या प्रगतीचा पाया आहे. यश नेहमी एका दिवसात मिळत नाही. तो सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम असतो. अपयश आले तरी प्रयत्न सोडले, तर विकास थांबतो. पण अपयशानंतरही प्रयत्न सुरू ठेवले, तर तेच अपयश भविष्यातील यशाची पायाभरणी करते.
२. प्रयत्नवादी विचारसरणीचे फायदे -
मनावरचा ताण कमी होतो कारण आपण परिणामाऐवजी प्रक्रियेला महत्त्व देतो. आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक छोट्या प्रयत्नातून अनुभव मिळतो. आव्हाने सहज वाटू लागतात कारण त्यांचा सामना करण्याची सवय तयार होते. समस्यांकडे नकारात्मक न बघता समाधान केंद्रित  दृष्टिकोन वाढतो.
३. ‘प्रयत्न’ आणि ‘यश’ यांचा संबंध
यश आपोआप येत नाही; प्रयत्नांच्या खडतर वाटेवरून चालतच ते गाठता येते. जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांच्या आधारेच लक्ष्य साध्य होते. ज्यांनी महान कार्य केले ते देखील सामान्यच होते पण त्यांची असामान्यता त्यांच्या निरंतर  प्रयत्नांत होती.
४. प्रयत्नवाद स्वीकारण्यासाठी काही मार्गदर्शक टिप्स -
काम लहान-लहान टप्प्यात विभागा आणि प्रत्येक टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. चुका झाल्या तरी त्यातून शिका, स्वतःला दोष देऊ नका. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा – आज मी माझ्या ध्येयासाठी काय प्रयत्न केले? हार न मानता एक पाऊल पुढे टाकत राहा.
जीवनात हमखास येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रयत्नवाद हेच सर्वात प्रभावी तत्त्व आहे. प्रयत्न करत राहणे हीच मोठी जिंक आहे. कारण प्रयत्न करणारा कधीच हरत नाही - तो शिकतो, वाढतो आणि अखेर यशाकडे वाटचाल करतो. म्हणूनच, परिस्थिती काहीही असो, प्रयत्नवादाला स्वीकारा आणि आपल्या आयुष्याला सकारात्मक दिशादर्शन करा.
Comments
Add Comment