Saturday, December 6, 2025

दिल्लीत राज ठाकरेंच्या नातवाचे पंतप्रधान मोदींनी केले लाड

दिल्लीत राज ठाकरेंच्या नातवाचे पंतप्रधान मोदींनी केले लाड

नवी दिल्ली : दिल्लीत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याचे डॉ. राहुल बोरुडे यांचे लग्न झाले. डॉ. राहुल बोरुडे हे अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांचे भाऊ आहेत. डॉ. राहुल बोरुडे यांच्या विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती. यामुळेच या विवाह सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले.

डॉ. राहुल बोरुडे यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे दोन दिवस दिल्लीत होते. यामुळे पंतप्रधान मोदी यांची लग्न सोहळ्यातील उपस्थिती चर्चेचा विषय झाली. लग्नाला उपस्थित राहण्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. पण या घटनेचा एकही फोटो अथवा व्हिडीओ अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. बैठकीची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे.

लग्न सोहळ्याला पंतप्रधान मोदी येताच थेट स्टेजवर गेले. बोरुडे दांपत्याला त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर बोरुडे दांपत्यासह फोटोसाठी पंतप्रधान मोदी उभे होते त्याचवेळी स्टेजवर अमित ठाकरे कडेवर मुलाला घेऊन आले. राज ठाकरेंचा नातू अमित ठाकरेंच्या कडेवर होता. अमित ठाकरे पंतप्रधान मोदींच्या शेजारी उभे राहिले. यानंतर फोटो काढण्यात आला. अमित ठाकरे जेव्हा स्टेजवर आले त्यावेळी पंतप्रधान मोदींनी स्मितहास्य केले आणि राज ठाकरेंच्या नातवाचे किआनचे हळूच गाल ओढून त्याचे लाड पुरवले.

डॉ. राहुल बोरुडे यांच्या विवाह सोहळ्याला पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे वरिष्ठ नेते, सर्वोच्च न्यायालयाचे निवडक न्यायाधीश आणि काही दिग्गज नेते उपस्थित होते.

Comments
Add Comment