मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भांतील विविध कामे प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असून निवडणुकीच्या कामाचे आदेश हाती पडताच महापालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची कामे करण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस द्यावी, असे सक्त आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी नुकतेच अधिकाऱ्यांना दिले. सुमारे ८ वर्षांच्या कालावधीनंतर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे, निवडणुकीच्या संदर्भातील संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने आणि काटेकोरपणे पार पाडणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आगामी महापालिका निवडणुक सुलभरीत्या पार पडवी यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अानुषंगाने आता दुबार मतदारांची छायाचित्रानुसार तपासणी करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. यापूर्वी मतदार यादीतील चुका सुधारण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी क्षेत्रभेटी सुरू केल्या होत्या. दरम्यान, द म्युनिसिपल युनियनने कामगारांना निवडणुकीची कामे न देण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले होते.
यापूर्वीही अनेक वेळा निवडणुकीच्या कामासाठी कामगार – कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असून त्यासाठी विविध खात्यातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नेमण्याची शक्यता आहे. येत्या १० डिसेंबरनंतर छायाचित्रांची तपासणी झाल्यांनतर दुबार नावे असलेल्या मतदारांच्या घरी महापालिका कर्मचाऱ्यांची क्षेत्रभेटी सुरू होणार आहेत. दरम्यान, निवडणुकीची कामे करण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस द्यावी, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना आता कोणत्याही परिस्थितीत ही कामे करावेच लागणार आहेत.
गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांबाबत ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे
या निवडणुकीच्या अानुषंगाने, संबंधित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी परस्परांमध्ये संवाद साधून समन्वयाने कार्यवाही करावी, अशीही सूचना जोशी यांनी केली. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीसंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेताना त्यांनी उपरोक्त आदेश दिले. तसेच, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, प्रभाग प्रारूप मतदार यादीसंदर्भात सुरू असलेल्या कामकाजाला गती द्यावी. प्रभाग प्रारूप मतदार यादीबाबत येणाऱ्या हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून यथोचित निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. निष्कासित करण्यात आलेल्या इमारतीत पूर्वी मतदान केंद्र असल्यास त्याच्या जागी पर्यायी मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावे. तसेच, गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांबाबत ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचना जोशी यांनी केल्या. त्यावेळी विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, महानगरपालिकेचे सह आयुक्त विश्वास शंकरवार, इतर सह आयुक्त व उपायुक्त, कोकण विभागाच्या अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोघ मुकादम, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी (मुंबई उपनगरे) अर्चना कदम, उपनिवडणूक अधिकारी (मुंबई शहर) शामसुंदर सुरवसे, महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांचे सर्व सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.
अतिरिक्त महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश
निवडणूक कामाबाबत पालिका कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
आठ वर्षांच्या कालावधीनंतर निवडणूक
मतदार यादीतील चुका सुधारण्यासाठी घरटी अभियान
दुबार नावेप्रकरणी मतदारांना भेटी






