Saturday, December 6, 2025

भारत-चीन सीमेजवळ मोस्ट वॉन्टेड महिला वाघ तस्कराला अटक

भारत-चीन सीमेजवळ मोस्ट वॉन्टेड महिला वाघ तस्कराला अटक

गंगटोक : मोस्ट वॉन्टेड महिला वाघ तस्कर यांगचेन लाचुंगपा अखेर तपासयंत्रणांच्या जाळ्यात अडकली आहे. भारत-चीन सीमेजवळ करण्यात आलेल्या कारवाईत तिला पकडण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्याघ्रतस्करीच्या अनेक प्रकरणांत तिचा शोध सुरू होता. मध्यप्रदेश व्याघ्र धडक पथक आणि नवी दिल्ली येथील वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्त कारवाई करून २ डिसेंबर रोजी उत्तर सिक्कीममधील लाचुग येथे यांगचेनला ताब्यात घेतले. या भागात तापमान उणे सात अंशांपर्यंत घसरले असतानाही पथकाने रचलेल्या सापळ्यात ती सापडली. तपासयंत्रणांना तिचा मागोवा अनेक महिन्यांपासून लागत नव्हता.

यांगचेन मूळची तिबेटची असून भारतात दिल्ली आणि सिक्कीममध्ये राहते. तिला २०१७ मध्ये पहिल्यांदा अटक झाली होती. पण जामिनावर सुटताच ती फरार झाली आणि त्यानंतर तिचा शोध अधिकच कठीण झाला. तिच्या अटकेनंतर गंगटोकमधून ट्रान्झिट वॉरंट मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून तिला लवकरच मध्यप्रदेशमध्ये आणण्यात येणार आहे. मध्यप्रदेश व्याघ्र धडक पथकाने आतापर्यंत ३१ शिकारी आणि तस्करांना अटक केली आहे. यांगचेनच्या अटकेमुळे व्याघ्रतस्करीच्या अनेक प्रकरणांबाबत नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >