विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने जिंकला. या विजयासह भारताने एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. निर्णायक सामना भारताने नऊ विकेट आणि ६१ चेंडू राखून जिंकला. भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली.
भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने १२१ चेंडूत दोन षटकार आणि १२ चौकारांच्या जोरावर नाबाद ११६ धावा केल्या. रोहित शर्मा ७३ चेंडूत तीन षटकार आणि सात चौकारांच्या जोरावर ७५ धावा करुन केशव महाराजच्या चेंडूवर मॅथ्यू ब्रीट्झकेकडे झेल देऊन परतला. विराट कोहलीने ४५ चेंडूत तीन षटकार आणि सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ६५ धावा केल्या.
याआधी नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेने ४७.५ षटकांत सर्वबाद २७० धावा केल्या. भारताला जिंकण्यासाठी ५० षटकांत २७१ धावा करायच्या आहेत. भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या तर अर्शदीप आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने १०६, रायन रिकेलटनने शून्य, टेम्बा बावुमाने ४८, मॅथ्यू ब्रीट्झकेने २४, एडेन मर्करामने एक, डेवॉल्ड ब्रेव्हिसने २९, मार्को जॅनसेनने १७, कॉर्बिन बॉशने नऊ, केशव महाराजने नाबाद २०, लुंगी न्गिडीने एक, ओटनील बार्टमनने तीन धावांचे योगदान दिले.
कुलदीपने डेवॉल्ड ब्रेव्हिस, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, लुंगी न्गिडी या चौघांना तर प्रसिद्ध कृष्णाने क्विंटन डी कॉक, मॅथ्यू ब्रीट्झके, एडेन मर्कराम, ओटनील बार्टमन यांना बाद केले. अर्शदीपने रायन रिकेलटनला तर रवींद्र जडेजाने टेम्बा बावुमाला बाद केले.
रोहित शर्माचा विक्रम
हिटमॅन रोहित शर्मा आता मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड यांच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वीस हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.
- सचिन तेंडुलकर : ३४,३५७ धावा
- विराट कोहली : २७,९१०* धावा
- राहुल द्रविड : २४,२०८ धावा
- रोहित शर्मा : २०,०४८* धावा






