लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका
मुंबई : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी चालू आहे. आगामी आयपीएल लिलाव १६ डिसेंबरला होणार आहे. पुढील लिलावापूर्वी, बीसीसीआयने विदेशी खेळाडूंसाठी एक नवीन नियम लागू केला आहे, ज्यामुळे मिनी-लिलावात विकल्या जाणाऱ्या खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता मिनी लिलावात मोठी कमाई करणाऱ्या खेळाडूंसाठी एक वेगळा नियम आणला आहे.
आयपीएल स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी अचानक माघार घेऊ नये आणि तसे केल्यास त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी लागू शकते, असा निर्णय गेल्यावर्षी आणला गेला. खेळाडूंनी स्पर्धेतून अचानक माघार गेल्याचा परिणाम फ्रँचायझींवर झाल्याची तक्रार मालकांनी केली होती. त्यानंतर बीसीसीआयने हे पाऊल उचलले. यानंतर आता विदेशी खेळाडूंसाठी एक नवा नियम समोर आला आहे.
काही विदेशी खेळाडू महालिलावात भाग घेणे टाळतात. त्याऐवजी, ते मिनी लिलावात त्यांची नावे सादर करतात. खरे तर, महालिलावामध्ये फ्रँचायझी त्यांचे संघ तयार करण्यासाठी करतात. या छोट्या लिलावात, फ्रँचायझी त्यांच्या संघातील रिक्त जागा भरून काढण्याचा प्रयत्न करतात. यामुळे, ते स्टार विदेशी खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. सर्व फ्रँचायझींनी याबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. आता बीसीसीआयने असा नियम केला आहे की विदेशी खेळाडूंना मिनी लिलावात १८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकणार नाही. समजा जर खेळाडूंवर २५ ते ३० कोटींची बोली लागली तरी त्यांना फक्त १८ कोटी रुपये पगार मिळेल.






