मुंबई : गोरेगावमधील विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने कपड्यांबाबत आचारसंहिता जाहीर केली असून विद्यार्थ्यांना धार्मिक पेहराव करून येण्यास बंदी घातली आहे. त्यानुसार महाविद्यालयात बुरखा-नकाब घालून येण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाविरोधात मुस्लम विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थ नगर येथे असलेल्या विवेक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता लागू केली. त्यात महाविद्यालयात येण्याच्या वेळा, प्रवेशद्वार बंद होण्याच्या वेळा याचबरोबर विद्यार्थ्यांनी कोणते पोशाख घालणे टाळावे, हे नमूद केले. या पत्रकात धार्मिक पोशाख परिधान करण्यावर बंदी घातली आहे. त्यानुसार मुस्लिम मुलींना बुरखा आणि नकाब परिधान करण्यास बंदी घातली आहे. मात्र हिजाब घालण्यास परवानगी दिली आहे.
या निर्णयाविरोधात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. यावेळी आम्ही येथे शिकायला येतो. आम्ही नकाब किंवा बुरख्यात जास्त सहजपणे वावरू शकतो. आमचा पोशाख आमच्या शिक्षणाच्या आड कसा येऊ शकतो, असा प्रश्न या विद्यार्थिनींनी उपस्थित केला.
एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच मनसेने सुद्धा महाविद्यालयामध्ये धार्मिक बाबी आणू नयेत अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. एमआयएमच्या आणि मनसेच्या सहभागामुळे या मुद्द्याने राजकीय स्वरूप धारण केले आहे. याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्य शिजा मेनन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. तसेच आमच्या वकिलांनी आंदोलनकर्त्या मुलींनाही उत्तर दिले असल्याचे सांगितले.






