Wednesday, December 3, 2025

सार्वजनिक ठिकाणी रोमान्स ठरू शकतो कायदेशीर गुन्हा

सार्वजनिक ठिकाणी रोमान्स ठरू शकतो कायदेशीर गुन्हा

मीनाक्षी जगदाळे भारतात कारमध्ये, सार्वजनिक ठिकाणी किंवा जवळपास कुठेही पार्किंग करून सेक्स किंवा रोमांस करणे हे सहसा भारतीय दंड संहिता (आयपीसी)च्या कलम २९४ अंतर्गत 'अश्लील कृत्य' म्हणून पाहिले जाऊ शकते. या कलमानुसार, जर सार्वजनिक ठिकाणी कोणतेही अश्लील कृत्य केले ज्यामुळे इतरांना त्रास होतो, तर तो दंडनीय अपराध असू शकतो, ज्यासाठी कारावास किंवा दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकतात.

कोणत्याही जोडप्याने रस्त्यात, कारमध्ये, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी भावनेच्या भरात मर्यादा ओलांडून रोमान्स करणे, लोकांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे हा अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. रिलेशनशिपमध्ये असताना, प्रेम प्रकरण असताना जोडप्याने एकमेकांच्या जवळ येणे, प्रेम व्यक्त करणे किंवा शारीरिक संबंध ठेवणे, हे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा आणि निवडीचा भाग आहे. मात्र, जेव्हा ही कृती सार्वजनिक ठिकाणी केली जाते, तेव्हा त्याचे गंभीर कायदेशीर आणि सामाजिक परिणाम होतात. आजकाल आधुनिकतेच्या, फॅशनच्या नावाखाली आपण सर्रास सर्वच मर्यादा ओलांडू लागलो आहोत. विशेषत: शालेय महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड अथवा विवाहबाह्य संबंध असलेले स्त्री-पुरुष अनेकदा कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणी आडोसा शोधून, सुनसान ठिकाणी अथवा अनोळखी जागेवर, निर्जनस्थळी, कारमध्ये, कॅफेमध्ये, जॉगिंग ट्रॅक, बागबगीचे, मैदाने या ठिकाणी स्वतःचे देहभान आणि आजूबाजूला कोण आहे, परिस्थिती काय आहे, आपण कुठे आहोत हे विसरून एकमेकांना नको तिथे शारीरिक स्पर्श करणे, रोमान्स करणे, शारीरिक संबंध ठेवणे या गोष्टी करताना दिसतात. आजमितीला असे करणे एक प्रकारची फँटॅसी आहे म्हणून, कुठे इतर ठिकाणी सहजासहजी जागा उपलब्ध नाही म्हणून अथवा त्यासाठी पैसे खर्च करायची तयारी अथवा तेवढी कुवत नाही म्हणून सुद्धा अनेकजण कुठे न कुठे सार्वजनिक ठिकाणी आपल्या प्रेमाला वाट मोकळी करून देताना दिसतात. हे करत असताना या कृत्यांची कायदेशीर बाजू काय आहे हे कितीजण लक्षात घेतात किंवा किती लोकांना याबद्दल माहिती आहे? यावर विचार झाला पाहिजे असे वाटते.

भारतात कारमध्ये, सार्वजनिक ठिकाणी किंवा जवळपास कुठेही पार्किंग करून सेक्स किंवा रोमांस करणे हे सहसा भारतीय दंड संहिता (IPC)च्या कलम २९४ अंतर्गत 'अश्लील कृत्य (Obscene Act)' म्हणून पाहिले जाऊ शकते. या कलमानुसार, जर सार्वजनिक ठिकाणी कोणतेही 'अश्लील कृत्य' केले ज्यामुळे इतरांना त्रास (Annoyance) होतो, तर तो दंडनीय अपराध असू शकतो, ज्यासाठी कारावास किंवा दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकतात. 'सार्वजनिक ठिकाणी' आणि 'अश्लील कृत्या' ची व्याख्या प्रत्येक प्रकरणात, स्थानिक सामाजिक नैतिकता आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार बदलू शकते. कार जरी तुमची खासगी जागा असली, तरी ती सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली असल्यास आणि त्यातील कृत्य बाहेरून दिसणारे, जाणवणारे, समजणारे असल्यास किंवा इतरांना त्रासदायक ठरल्यास, पोलीस कारवाई करू शकतात. अशा अविचारी कृती करताना त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पोलिसांनी पकडल्यास, तुमच्यावर IPC कलम २९४ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. याच्या नोंदीमुळे तुमच्या भविष्यातील नोकरी किंवा पासपोर्ट पडताळणीवर परिणाम होऊ शकतो. पोलिसांकडून चौकशी आणि कायदेशीर प्रक्रियांचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाचे म्हणजे यामुळे त्या अवस्थेत पकडल्या गेलेल्या महिलेला सगळ्यांसमोर अपमानित व्हावे लागते. जवळपास, त्या ठिकाणी चुकीच्या प्रवृत्तीचे लोक असल्यास तुम्हाला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे पैशांची मागणी केली जावू शकते. शाळा, कॉलेजच्या मुली अनेकदा गणवेशात असताना पर्यटन स्थळ, समुद्र किनारा, पब्लिक व्हेकल या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत पाहायला मिळतात. अशा मुलींनी हे भान ठेवणे आवश्यक आहे की आपण अशा वागणुकीतून किती मोठ्या धोक्याला आमंत्रण देत आहोत.

अनेकदा गुन्ह्यांची सुरुवात अशा सार्वजनिक ठिकाणी होण्यामागे असे कपल कारणीभूत ठरतात. केवळ स्वतःची शारीरिक गरज भागवण्यासाठी कोणताही पुरुष अथवा मुलगा स्त्रीला सार्वजनिक ठिकाणी नको त्या अवस्थेत नेत असेल, तर आजूबाजूला असणाऱ्या इतर चुकीच्या प्रवृत्तीना आमंत्रण देण्यासारखे आहे. अनेकदा हे कपल जिथे थांबतात, तेथील स्थानिक गुंड प्रवृत्तीची मुले, टवाळखोर किंवा इतर लोक याचा फायदा घेऊन गाडीची तोडफोड करणे, त्या जोडप्याला त्रास देणे, अश्लील शब्द वापरणे असे प्रकार करतात. दोघांना मारहाण करणे, महिलेचा विनयभंग करणे, बलात्कार करणे, तिला अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत बोलणे, लोकांना जमवून त्यांची कानउघाडणी करणे, गाडीला घेराव घालणे, त्यांच्याजवळच्या मौल्यवान वस्तू हिसकावून घेणे यांसारखे प्रकार घडू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदनामीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही पकडले गेल्यास, तुमची बदनामी होऊ शकते. तुमचे कुटुंबीय, मित्र-मैत्रीण, शेजारी आणि कार्यालयात याबद्दल कळल्यास तुमच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सुरक्षितता आणि गोपनीयता याबद्दल बोलायचं झाल्यास अशा ठिकाणी, तुम्ही किंवा तुमचा जोडीदार सर्वच बाबतीत असुरक्षित असू शकताे. तुमचे फोटो किंवा व्हिडीओ काढले जाऊन ते व्हायरल होण्याची भीती असते, ज्यामुळे तुमच्या गोपनीयतेचा भंग होतो. आजकाल कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असू शकतात.

तुमच्याही नकळत तुमच्या खासगी प्रसंगाचे चित्रण होऊ शकते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्याला जरी वाटत असले की आपल्याला कोणी पाहत नाही तरी आजमितीला प्रत्येक फोनमध्ये असलेला कॅमेरा, पोलिसांनी जागोजागी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तुमचे चित्रीकरण करू शकतात. आपल्यासोबत असलेल्या महिलेला समाजात मान खाली घालावी लागणार नाही अथवा तिला कोणी चुकीचे अश्लील बोलणार नाही ही जबाबदारी संबंधित पुरुषाची असते. आपणच सार्वजनिक ठिकाणी नको ते प्रदर्शन करत असलो, तर ते इतर लोकांना आमंत्रण देण्यासारखे आहे.

रिलेशनशिपमध्ये प्रेम, शारीरिक गरज आणि जवळीक महत्त्वाची आहे, तितकाच विश्वास, जोडीदाराची सुरक्षितता, त्याची सामाजिक प्रतिमा जपणे पण दोघांचे नैतिक कर्तव्य आहे. विशेषकरून महिलांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की जो जोडीदार सार्वजनिक ठिकाणी तुमच्यासोबत अश्लील प्रकार करतोय अथवा तुम्हाला अश्लील चाळे करायला लावतो तो खरंच तुमच्यावर प्रेम करतोय का, त्याला तुमच्या इज्जतीची पर्वा आहे का, त्याला तुमच्यासोबत आरामदायी, सुरक्षित, संस्मरणीय भेट करायची आहे की फक्त स्वतःची वासना भागवायची आहे. फक्त टाईमपास म्हणून मजा करायला रस्त्यावर अथवा पब्लिक प्लेसला भेटणाऱ्या पुरुषासोबत मैत्री करताना अथवा संबंध वाढवताना विचार करणे गरजेचे आहे. कोणत्याही कायदेशीर अडचणी आणि धोक्यांपासून वाचण्यासाठी लक्षात घ्या की, सार्वजनिक ठिकाणी अशी कृत्ये करणे योग्य नाही. गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, तुम्ही खासगी जागा जसे की हॉटेलचे रूम, रिसॉर्ट, चांगल्या टुरिस्ट प्लेसला उपलब्ध असलेले होम स्टे, कॉटेज किंवा कोणतेही सुरक्षित ठिकाण निवडणे हे नेहमीच उत्तम आणि कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित असते. सार्वजनिक ठिकाणी केवळ प्रेम व्यक्त करण्याच्या (उदा. हात धरणे, साधे मिठी मारणे) मर्यादेबद्दल स्थानिक नियम व सामाजिक संकेत कायम लक्षात ठेवणे काळाची गरज आहे. आपल्या भावना आपल्यासाठी जरी प्रेम असले तरी सार्वजनिक ठिकाणी त्याचे प्रदर्शन केल्यामुळे इतरांच्या दृष्टिकोनातून ते अश्लील लैंगिक चाळे ठरतात.

Comments
Add Comment