४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती
मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे पर्यटक, नागरिकांना मुंबई महानगरपालिकेने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. समुद्राला ४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती येणार आहे. किनाऱ्यावर साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीचा तपशिल मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने जाहीर केला आहे. यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरतीदरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंची नमूद करण्यात आली आहे. समुद्रात ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३९ च्या सुमारास ५.०३ उंचीच्या लाटा उसळणार आहेत. पुढील तीन दिवस मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यानजीक जाऊ नये, तसेच या अानुषंगाने मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे अनुयायी येण्याची शक्यता आहे. त्या दरम्यानच समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पालिका प्रशासनाने सूचित केले आहे.
मोठ्या भरतींचा तपशील खालीलप्रमाणे :
दिवस वेळ लाटांची उंची (मीटरमध्ये) गुरुवार ४ डिसेंबर रात्री ११:५२ ४.९६ शुक्रवार ५ डिसेंबर सकाळी ११:३० ४.१४ शुक्रवार ५ डिसेंबर मध्यरात्री १२:३९ ५.०३ शनिवार ६ डिसेंबर दुपारी १२.२० ४.१७ शनिवार ६ डिसेंबर मध्यरात्री १.२७ ५.०१ रविवार ७ डिसेंबर दुपारी १.१० ४.१५






