दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर पुरूषांपेक्षा महिलांची गर्दी नेहमीच अधिक असते. मात्र, नुकताच पाणीपुरी खाताना एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार घडला आहे, ज्यामुळे एका महिलेच्या जीवावर पाणीपुरी खाणे बेतले आहे. उत्तर प्रदेशातील औरैयाच्या दिबियापूर पोलिस स्टेशन परिसरातील गौरी किशनपूर काकोर येथील रहिवासी असलेल्या इंकला देवी या त्यांच्या भाची आणि सुनेच्या प्रसूतीसाठी कुटुंबासह औरैया जिल्हा रुग्णालयाजवळ थांबल्या होत्या. यादरम्यान, सर्वांनी पाणीपुरी खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि सर्वजण पाणीपुरीच्या गाड्यावर पोहोचले. इंकला देवी आनंदात पाणीपुरी खात असताना, त्यांनी तोंड मोठे केले. मात्र, त्यानंतर अचानक त्यांचा जबडा जागच्या जागी अडकला. त्यांना प्रचंड वेदना सुरू झाल्या आणि अनेक प्रयत्न करूनही त्यांचा जबडा खाली येत नव्हता. अचानक तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करावे लागले. आनंदाने सुरू झालेला पाणीपुरी खाण्याचा अनुभव एका महिलेच्या जीवावर बेतण्याची ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
पाणीपुरी खाताना जबडा निखळला
इंकला देवी यांनी प्लेटमधील मोठी पाणीपुरी उचलली आणि खाण्यासाठी तोंड उघडले. पाणीपुरी तोंडात ठेवल्यानंतर त्यांचा जबडा अचानक जागच्या जागी अडकला आणि अनेक प्रयत्न करूनही तो खाली आला नाही, त्यामुळे तोंड बंदच झाले नाही. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, अगोदर हसी-मजाक सुरू होता, पण जबडा अडकल्यावर प्रचंड त्रास सुरू झाल्याने त्या वेदनेने रडत होत्या. इंकला देवी यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉ. मनोज कुमार यांनी सांगितले की, "इंकला देवी यांचा जबडा पूर्णपणे निखळला होता. आम्ही अनेक वेळा मॅन्युअली (हाताने) जबडा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही." डॉ. मनोज कुमार यांनी ही केस त्यांच्या आयुष्यातील सर्वात दुर्मिळ असल्याचे सांगत, त्यांना पुढील उपचारांसाठी सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये रेफर केले. अखेर, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून जबडा पूर्ववत करण्यात आला. पाणीपुरीच्या एका क्षुल्लक घटनेमुळे एका महिलेला शस्त्रक्रिया करावी लागल्याची ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.






