Tuesday, December 2, 2025

ऐसी मती जयाची थोर!

ऐसी मती  जयाची थोर!

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

१९९० नंतर जगात जागतिकीकरण खासगीकरण-उदारीकरण हे शब्द आपल्या सतत कानांवर आदळत आले. त्याचबरोबर जग हे ‘ग्लोबल व्हिलेज’ झाले पाहिजे, हा घोषही जागतिकीकरणाच्या सुसाट वादळासोबत आमच्या कानावर आदळत आला. सगळेच ‘ग्लोबल’ म्हणजे अक्षरशः सपाटच करायचे असा सूर सर्वत्र घुमू लागला.

जग एकसारखे करायच्या या सुरात सूर मिसळून सारेच गरागरा फिरू लागले. खरे तर खूप वेगळ्या अर्थाने ‘पृथ्वी हे कुटुंब’ वसुधैव कुटुंबकम् हा संदेश संबंध जगाला देत आले. यात जगातील प्रत्येकाशी पृथ्वीतलावरील ‘जीव’ या अर्थाने मनांचा भावस्पर्शी पूल जोडणे होते पण स्वत्वाचा त्याग करून तो जोडणे अभिप्रेत नव्हते.

आमच्या ज्ञानोबांनी तर ‘हे विश्वचि घर, ऐसी मती जयाची थोर’ असे म्हटलेच आहे. त्यांचे पसायदान आणि त्यातील आशय समजून घेणे म्हणजे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे मर्मच जाणणे.

व्यापक आणि उदार दृष्टिकोन किती तर केवळ माणूसच नाही तर प्राणी आणि किडे -मुंग्यांना देखील त्यांचा आनंद मिळवण्याचा, सुखाने जगण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यांच्यासाठीही ज्ञानोबांनी पसायदान मागितले आहे. अशा ज्ञानेश्वरांचा वसा आपण मिरवतो आहोत, हे विसरून चालणार नाही.

मध्यंतरी एक बातमी वाचली. एका मराठी मुलाला रेल्वे गाडीतल्या एका भांडणात एका गटाने घेरले आणि त्याचा धसका घेऊन त्याने आत्महत्या केली.

बातमीत त्याने जे सांगायचे, ते तो मराठीत बोलला नाही, असा संदर्भ होता. यात काय खरे, काय खोटे हे ठाऊक नाही, मात्र धर्म, जात या कारणांसारखे ‘भाषा’ हे दंग्यांचे कारण होऊ नये असे मनापासून वाटते.

आपल्या भाषेचा अभिमान ही सहज स्वाभाविक गोष्ट आहे. तोच खरे तर इतर भाषेचा सन्मान करायला शिकवतो.आपले स्वत्व गमावू नये नि इतरांचे स्वत्व पायदळी तुडवू नये इतकी आपली मती थोर असू शकेल का?

Comments
Add Comment