Tuesday, December 2, 2025

विमानतळाजवळच्या 'रिअल इस्टेट'चं चांगभलं

विमानतळाजवळच्या 'रिअल इस्टेट'चं चांगभलं

प्रा. सुखदेव बखळे

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊन दोन महिने झाले. २५ डिसेंबरपासून या विमानतळावरून आकासा आणि इंडिगोच्या विमान वाहतूक सेवा सुरू होणार आहेत. त्या अगोदरच विमानतळाच्या जवळ रिअल इस्टेटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अनेक कंपन्यांनी या परिसरात गुंतवणूक सुरू केली आहे. बुलेट ट्रेन, मेट्रोने विमानतळ जोडले जाईल, तेव्हा नव्या मुंबईचे स्वरूप खऱ्या अर्थाने बदललेले असेल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आजूबाजूच्या परिसरात जमीन आणि घरांची मागणी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झालं. त्यानंतर या विमानतळाच्या बाकी राहिलेल्या कामांना गती आली. सध्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. अजून काही टप्पे पूर्ण होणे बाकी आहे. हे विमानतळ मुंबईच्या दोन्ही जुन्या विमानतळांशी जोडले जाणार आहे. नवी मुंबई विमानतळावरून पुण्याच्या दिशेने येणारा साडेतीन हजार कोटी रुपयांचा आणखी एक रस्ता तयार होत आहे. याशिवाय विमानतळाला जोडणारे कल्याणसह अन्य ठिकाणचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. बुलेट ट्रेन विमानतळाजवळील परिसरातून जात आहे. त्यामुळे एकात्मिक गतिमान वाहतुकीचा कॉरिडॉर नव्या मुंबईत तयार होत आहे. या सर्वांचा परिणाम नवी मुंबई परिसराच्या विकासावर होत आहे. त्यामुळे रिअल इस्टेटलाही चांगले दिवस आले आहेत. पहिल्या व्यावसायिक उड्डाणापूर्वीच रिअल इस्टेटच्या किमती गगनाला भिडत आहेत. ‘ॲनारॉक रिसर्च’ या संस्थेच्या अभ्यासानुसार उळवे, पनवेल, तळोजा आणि खारघरमधील जमिनीच्या किमती गेल्या काही काळात ५०-६० टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर घरांच्या किमती २०-४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. विमानतळाची उभारणी सुरू असल्यापासून निवासी आणि व्यावसायिक जागांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. विमानतळ असलेल्या उळवेमध्ये निवासी किमतींमध्ये सर्वाधिक ४० टक्के वाढ झाली आहे, तर खारघरमध्ये या कालावधीत २० टक्के वाढ झाली आहे.

ॲनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्सचे अध्यक्ष अनुज पुरी यांच्या म्हणण्यानुसार पुढील दोन वर्षांमध्ये जमिनीच्या किमतीमध्ये ३० ते ४० टक्के अतिरिक्त वाढ होण्याची शक्यता आहे. बहुतेक कॉर्पोरेट कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळाजवळील जमिनी आधीच विकत घेतल्या असल्याने जमिनीच्या किमतीत आणखी वाढ झाल्यास विमानतळाच्या प्रभावक्षेत्रातील एकूण मालमत्तेच्या किमतींवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘स्क्वेअर यार्डस’ या रिअल इस्टेट कंपनीचे प्रमुख भागीदार आणि मुख्य विक्री अधिकारी दीपक खंडेलवाल यांनी या परिसरातील किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्य सरकारने नवी मुंबई परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसरी मुंबई नवी मुंबईनजीक असल्याने अगोदर नवी मुंबई परिसरात विकासाचा वेग वाढला आहे. राज्य सरकारबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या परिसराच्या विकासाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करून व्यवस्थित अंमलबजावणी केल्यामुळे शहरांच्या अंतर्गत भागात वाहतुकीच्या कोंडीसह अन्य समस्या येत नाहीत. आर्थिक वर्ष २०२१ ते आर्थिक वर्ष २०२५ दरम्यान पनवेल परिसरातील घरांच्या किमती सुमारे ७४ टक्क्यांनी वाढून दहा ते बारा हजार रुपये प्रति चौरस फूट झाल्या आहेत, तर नवी मुंबईतील उर्वरित भागात घरांच्या किमतीत ४५ टक्के वाढ झाली आहे. या भागात मालमत्तेच्या किंमती १९ ते २० हजार रुपये प्रति चौरस फुटांपर्यंत गेल्या आहेत. नवी मुंबईबरोबरच विकसित झालेल्या अन्य उपनगरांच्या आणि मालमत्तांच्या किमतीपेक्षा या किमती जास्त आहेत. पनवेल भागाचे उदाहरण घेतल्यास भूखंडाचे दर सरासरी ८० हजार ते ८५ हजार रुपये प्रति चौरस यार्डपर्यंत पोहोचले आहेत. त्यात झालेली ९३ टक्के वाढ ही सर्वाधिक आहे. नवी मुंबईच्या इतर भागांमधील दरांमध्ये ५८ टक्के वाढ झाली आहे. तिथे किमती जास्त आहेत. पूर्णपणे कार्यरत झाल्यावर देशातील सर्वात मोठे विमानतळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन जवळ येताच प्रॉपर्टी डेव्हलपर्सनी अनेक प्रकल्प सुरू केले. गेल्या तीन वर्षांमध्ये नवी मुंबईत सुमारे ४५ दशलक्ष चौरस फूट निवासी जागा सुरू करण्यात आल्या. त्यापैकी सुमारे ६७ टक्के जागा फक्त चार प्रमुख सूक्ष्म बाजारपेठांनी दिल्याचे ॲनारॉकने म्हटले आहे. या कालावधीत मुंबईत २८२ दशलक्ष चौरस फूट जागेवरील नव्या प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. ‘अनेक मोठे विकासक या भागात महत्त्वाकांक्षी निवासी प्रकल्प सुरू करत आहेत. त्यामुळे खारघर, पनवेल, उळवे आणि तळोजा ही प्रमुख निवासी केंद्र बनली आहेत’, असे पुरी यांनी सांगितले. द गार्डियन्स रिअल इस्टेट ॲडव्हायझरीचे सह-संस्थापक आणि सीईओ राम नाईक यांना उळवेसारख्या प्रमुख सूक्ष्म बाजारपेठांमध्ये मालमत्तेच्या मागणीत अनेक पटींनी वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. पूर्वी संभाव्य विकसनशील क्षेत्र म्हणून गणला जाणारा हा परिसर आता उच्च-मागणीच्या कॉरिडॉरमध्ये रूपांतरित होईल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, आगामी मेट्रो लाइन्स आणि सायन-पनवेल महामार्ग विस्ताराद्वारे सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे संपूर्ण पट्ट्याला दक्षिण मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी जलद प्रवेशाचा फायदा होईल. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून, नवी मुंबई त्याच्या सुवर्ण टप्प्यात प्रवेश करत आहे, असे ते म्हणाले. पुढील काही वर्षांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात निवडक ठिकाणी २० ते ३० टक्के भांडवलवाढ होऊ शकते. दर्जेदार प्रकल्प आणि वेळेवर अंमलबजावणीची क्षमता असलेले विकासक त्याचा सर्वाधिक फायदा घेऊ शकतात, तर खरेदीदारांना मुंबईतील संतृप्त बाजारपेठांच्या तुलनेत दीर्घकालीन मूल्य जास्त मिळेल. सीबीआरईचे भारत, आग्नेय आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकाचे अध्यक्ष आणि सीईओ अंशुमन मॅगझिन यांच्या माहितीनुसार नवी मुंबई विमानतळाचा शहराच्या रिअल इस्टेटवर, विशेषतः विमानतळाच्या आसपासच्या भागात, परिवर्तनकारी परिणाम होईल. विमानतळ कर्मचारी, कार्यरत व्यावसायिक आणि विमान वाहतूक कर्मचाऱ्यांच्या गरजांमुळे विमानतळाभोवती निवासी जागांची मागणी वाढण्याची शक्यता आहे, तर लॉजिस्टिक्स पार्क, कार्यालये आणि हॉटेल्सच्या विकासामुळे व्यावसायिक मागणी वाढण्याची शक्यता आहे. मालमत्ता विकासक किमती वाढण्याबाबत तितकेच उत्साही आहेत. किमती स्थिर होण्यापूर्वी नजीकच्या भविष्यात त्या आणखी २०-२५ टक्के वाढतील. नवी मुंबई परिसरात ज्या भागात किमती वाढल्या नाहीत, त्या आता वाढतील. वाधवा ग्रुपचे एमेरिटस अध्यक्ष विजय वाधवा म्हणाले, की खारघरसारखी ठिकाणे आता महाग झाली आहेत. अलीकडेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जद्वारे संचालित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने पनवेलमधील वाधवा वाईज सिटी या टाउनशिप प्रकल्पात वाधवा ग्रुपकडून ४०५ ‘रेडी टू मूव्ह इन’ फ्लॅट्स भाड्याने घेतले आहेत. चांगल्या सुविधांसह निवासी संकुलांना येथे चांगली मागणी आहे.

आमच्या मते येथे काम करणाऱ्या लोकांकडून एकूण परिसराला खूप मागणी येईल. पनवेल, खारघर आणि उळवेचा विकास नवी मुंबई ३.०च्या उद्योन्मुख दृष्टिकोनाशी खोलवर जोडलेला आहे, जो या प्रदेशाला मुंबईच्या संरचित शहरी विस्तारात रूपांतरित करत आहे. नवी मुंबईचे ऑफिस मार्केट म्हणून असलेले धोरणात्मक स्थान, विमानतळाद्वारे वाढलेली कनेक्टिव्हिटी आणि जागतिक प्रवेश यामुळे पुढील काही वर्षांमध्ये या भागात ऑफिस भाडेपट्ट्याने देण्याचा व्यवसाय आणि भाडीही वाढण्याची शक्यता आहे. विमानतळाशेजारी प्रस्तावित ६६७ एकर नवी मुंबई एरोसिटी कारकिर्दीच्या संधी आणि जीवनशैलीचे मिश्रण करणारी एक नवी शहरी परिसंस्था वाढवेल. नवी मुंबई विमानतळ या परिसरातील पाच-दहा किलोमीटर भागाच्याच विकासाला हातभार लावेल असे नाही, तर शेजारच्या रायगड जिल्ह्यातील काही भागांच्या आणि प्रामुख्याने तिसऱ्या मुंबईच्या विकासात महत्वाचे योगदान देईल.

Comments
Add Comment