Tuesday, December 2, 2025

मध्य महाराष्ट्रात नाट्यक्षेत्रात अनास्थेचे प्रयोग

मध्य महाराष्ट्रात नाट्यक्षेत्रात अनास्थेचे प्रयोग

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या सांस्कृतिक प्रवाहात नाट्यकलेला विशेष स्थान आहे. बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह टिळक स्मारक, भरत नाट्य मंदिर यांसह अनेक नाट्यगृहे आहेत. यामुळेच पुण्यामध्ये नाट्यसंस्कृती फुलली; परंतु गेल्या काही वर्षांत या नाट्यगृहांची अवस्था बदलत चालली आहे. जी रंगभूमी कलेचा केंद्रबिंदू होती तिथेच आता देखभालीबाबत अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे.

बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक, भरत नाट्य मंदिर, विठ्ठलराव तुपे पाटील नाट्यगृह या नाट्यगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात नाटकांचे प्रयोग होत असतात. पण, सर्वच नाट्यगृहांची दुरवस्था होत चालली आहे. बालगंधर्व रंगमंदिरात कधी एसीच्या डक्टमध्ये आग लागते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये उंदरांचे साम्राज्य आहे. इतर काही नाट्यगृहांत स्वच्छतागृहांची परिस्थिती दुर्लक्षित आहे. काही ठिकाणी रंगकर्मींच्या सुविधांमध्ये त्रुटी आहेत. कुठे ध्वनियंत्रणा बंद, कुठे वातानुकूलित यंत्रणा बंद, कुठे तुटलेल्या अवस्थेतील खुर्च्या, कुठे भेगा पडलेले मंच अशा तक्रारी कायमच असतात. यावर तात्पुरती डागडुजी होते. त्यामुळे या सर्व अडचणींवर महापालिकेने भूमिका घेणे गरजेचे आहे. तात्पुरत्या उपाययोजना करून काहीच उपयोग नाही. त्यावर कायमचा तोडगा काढणे आवश्यक आहे. शहरातील १५ नाट्यगृहांपैकी केवळ महत्त्वाच्या चार-पाच ठिकाणी नाटकांचे प्रयोग होत असतात. बाकी ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, शाळांची स्नेहसंमेलने, राजकीय कार्यक्रम होत असतात. प्रेक्षक हे नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी येतात. पण, त्यांच्यासाठी स्वच्छता, वाहनतळ, रंगमंच व्यवस्था अशा महत्त्वाच्या सुविधा पुरविण्यास महापालिका अपुरी पडते.

वारंवार हेच प्रश्न उपस्थित होऊन तात्पुरती मलमपट्टी केली जाते. कोरोनानंतर याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने सांस्कृतिक धोरण तयार करून नाट्यगृहांच्या प्रश्नाबाबत तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. या सर्व समस्यांसह नाट्यगृहांच्या ऑनलाईन बुकिंगबाबत येणाऱ्या अडचणी ही समस्या सर्वांनाच येते. यावरही काहीतरी तोडगा काढला पाहिजे. महापालिकेकडून नाट्यगृहांची देखभाल, दुरुस्ती केली जाते. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही होतो. पण, तरीसुद्धा समस्या काही सुटत नाहीत. नाट्यागृहांमध्ये बांधकाम व अन्य सुधारणांबाबत भवन विभागाला आणि विद्युतविषयक कामांबाबत विद्युत विभागाला कळवले जाते. त्यानुसार कामे करून घेतली जातात. वारंवार तक्रारी केल्यानंतरही नाट्यगृहात स्वच्छता नसते. तक्रारी केल्यानंतर स्वच्छतेत फारशी सुधारणा होत नाही. त्यामुळे स्वच्छता आणि पेस्ट कंट्रोलचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येतो. पुण्यातील अनेक नाट्यगृहांच्या इमारतींना गळती, भेगा, जुनी झालेली रंगमंच व्यवस्था आणि अपुरी देखभाल यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात काही नाट्यगृहांमध्ये छताला गळती लागते; तर काही ठिकाणी बसण्याची आसने तुटकी, डळमळीत किंवा अस्वच्छ असल्याचे चित्र दिसते. रंगमंचावरील लाकडी फ्लोअरिंग जुने झाल्याने कलाकारांना सराव वा प्रयोगांच्या वेळी अडचणी निर्माण होतात. प्रकाशव्यवस्था आणि ध्वनिसंस्था देखील कालबाह्य झाल्याने प्रयोगांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. नाट्यगृहांच्या मागील भागात संग्रहित पडदे, सेट्स आणि साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक जागा व सुविधा उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी विद्युत व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडामुळे प्रयोग थांबण्याचीही उदाहरणे घडली आहेत. अशा स्थितीमुळे व्यावसायिक गटच नव्हे तर शालेय व महाविद्यालयीन संघांनाही योग्य जागा मिळणे कठीण झाले आहे. नाट्यगृहांच्या सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी शासन, स्थानिक संस्था, खासगी प्रायोजक आणि नागरिक यांचा समन्वयित सहभाग आवश्यक आहे. आधुनिक प्रकाशयोजना, अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था, सुरक्षित रंगमंच, प्रशस्त बसण्याची व्यवस्था, तसेच दिव्यांगांना सोयीस्कर अशा मार्गदर्शक सुविधा असणाऱ्या गोष्टी तातडीने उपलब्ध करण्याची गरज आहे. नाट्यगृहांची दुरवस्था ही केवळ भौतिक सुविधांची कमतरता नाही; तर प्रशासनाच्या दीर्घकाळच्या दुर्लक्षाचे परिणाम आहेत. अनेक नाट्यगृहांचे रखडलेले दुरुस्ती प्रस्ताव, निधीअभावी होणारा उशीर, तसेच जबाबदार विभागांच्या समन्वयाची कमतरता यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. काही नाट्यगृहांना नव्याने दुरुस्तीचे निधी मंजूर झाले असले, तरी काम केव्हा सुरू होईल, कसे होईल याबाबतची स्पष्टता नसते.

नवीन नाट्यगृहे रखडलेलीच

पुण्यात गेल्या काही वर्षांत केवळ हडपसर येथील विठ्ठलराव तुपे पाटील नाट्यगृह सोडले तर एकही नवे नाट्यगृह सुरू झालेले नाही. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारातील बाळासाहेब ठाकरे कलादालन, छत्रपती शिवाजीराजे भोसले सांस्कृतिक भवन व कला मंदिर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रखडले आहे. निवडणूक होऊन सभागृह अस्तित्वात आल्यावर लवकर या नाट्यगृहांकडे लक्ष दिले पाहिजे.

उपाययोजना आणि पुढील दिशा

पुण्यातील नाट्यगृहांचे उन्नतीकरण करण्यासाठी नियमित देखभाल निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. वर्षाकाठी नाट्यगृहांना आवश्यक असलेला देखभाल निधी निश्चित करणे महत्त्वाचे आहे. मोठ्या नाट्यगृहांच्या आधुनिकीकरणासाठी प्रायोजक आकर्षित करणे. ध्वनी, प्रकाश आणि रंगमंच व्यवस्थेचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिकीकरण करायला पाहिजे. अग्निसुरक्षा, विद्युतसुरक्षा आणि संरचनात्मक सुरक्षिततेची नियमित तपासणी केली गेली पाहिजे. लहान-मोठ्या गटांना सहज उपलब्ध होईल अशी सरावाच्या जागेची निर्मिती असली पाहिजे. पार्किंग, प्रसाधनगृह, तिकीट व्यवस्था आणि मार्गदर्शन फलकांची सुधारणा करणे गरजेचे आहे. या उपाययोजनांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी केली तरच नाट्यगृहांचे पुनरुत्थान शक्य होईल. पुणे ही केवळ शैक्षणिक राजधानी नाही, तर मराठी नाट्यजगताचे महत्त्वाचे केंद्र आहे. आज हीच केंद्रे दुरवस्था, दुर्लक्ष आणि कालबाह्य व्यवस्थेमुळे झाकोळून गेली आहेत. नाट्यगृहांची अधोगती थांबवून त्यांचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांचा सहभाग, प्रशासनाची इच्छाशक्ती आणि सांस्कृतिक संस्थांची सक्रिय भूमिका या तिन्हींच्या संयुक्त प्रयत्नांतूनच पुण्यातील नाट्यगृहांना पुन्हा नवसंजीवनी मिळू शकते. नाटक हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नाही; तर समाजमन घडवणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे नाट्यगृहांचे संवर्धन हे कलाप्रेमी पुणेकरांचे सांस्कृतिक कर्तव्यच ठरते.

Comments
Add Comment