डहाणू (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील साखरे येथील आश्रमशाळेजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास नवजात अर्भक मृतावस्थेत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आले. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. तसेच या अमानवी प्रकाराची माहिती तात्काळ डहाणू पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी तुषार पाचपुते आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अर्भकाचे मृत शरीर पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे अर्भक जन्मानंतर काही तासांतच किंवा लगेचच बेवारसपणे कचऱ्यात फेकून देण्यात आले असावे. कचऱ्यात फेकल्यामुळे अर्भकाचा थंडी, भूक किंवा श्वास गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
पालघर जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या काही वर्षांमध्ये नवजात शिशूंना सार्वजनिक ठिकाणी किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडून देण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वीच पालघर रेल्वे स्थानकावरही एक दिवसाचे अर्भक आढळून आले होते, ज्याला पोलिसांनी जीवदान दिले. आई-वडिलांना नको असलेल्या या नवजात अर्भकांना अनेकदा निर्जन भागात, कचरा जमा होण्याच्या ठिकाणी किंवा झुडपांमध्ये टाकले जाते. यामुळे पोलिसांना आरोपींचा शोध घेणे आणि पुरावे जमा करणे हे एक मोठे आव्हान ठरत आहे.
अर्भकाला सोडून देणाऱ्या व्यक्तीचा किंवा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, स्थानिक लोकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, मागील काही दिवसांत परिसरातील रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये झालेल्या प्रसूतीची माहिती देखील तपासली जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले जात आहेत.






