Monday, December 1, 2025

कोकणात उबाठा हरवलीय!

कोकणात उबाठा हरवलीय!

वार्तापत्र : कोकण

पक्षीय राजकारणात निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जात विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आजवर आपण काय केलं आणि पुढील पाच वर्षांत आपण शहराच्या विकासासाठी काय करणार आहोत याचं नियोजन आणि शहर विकासाचा आराखडा, शहराचं भविष्यकालीन व्हिजन जनतेसमोर मांडणे आवश्यक असते. निश्चितपणे लोकही पाच वर्षांत कोणती कामे करण्यात आली, याचं मोजमापही करतील. कोकणातील या निवडणुकीतही कोणता पक्ष जिंकेल, कोणता पक्ष हरणार यावर जिल्हा परिषदेचं भवितव्य बिलकूल अवलंबून नाही. याचं कारण शहरी आणि ग्रामीण असा फरक असणारच. शहरांचे प्रश्न वेगळे आहेत. ग्रामीण भागांच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुका या वेगवेगळ्या पातळीवरच राहतात. मात्र, या निवडणुकीत उबाठा शोधावी लागेल अशी स्थिती आहे.

महाराष्ट्रात नगर परिषद, नगरपंचायत निवडणूक अंतिम टप्प्यात आहेत. २ डिसेंबर २०२५ या दिवशी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीलाही नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदेगट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी महायुती सत्तेत आहे. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी राज्यात महाविकास आघाडी आहे. सुरू असलेल्या नगर परिषद नगरपालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतही फूट पडली आहे. अर्थात स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साहजिकच प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला नगरसेवक होण्याची सुप्त इच्छा असते. त्यातच नगर परिषद, नगरपंचायत निवडणुका या जवळपास सात-आठ वर्षांनंतर होत आहेत. त्यामुळे मधल्या काळात कार्यकर्त्यांची संख्याही वाढत गेलेली असते. पाच-दहा वर्षांमध्ये कार्यकर्ते नव्याने तयार होत असतात. काही भागात नव्याने तयार होणाऱ्या कार्यकर्त्याला फक्त कार्यकर्ता म्हणूनच राहावे लागते. नव्याना संधी मिळत नाहीत. काही जुने वजनदार नगरसेवक वॉर्ड बदलून दुसरीकडे निवडणूक लढवताना दिसतात. त्यामुळे साहजिकच त्या त्या वॉर्डमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर तो अन्यायच असतो. यातही जे नगर परिषदेत सत्तेवर असतात, ते आपल्या ‘सोईचे’ असणाऱ्यांनाच निवडणुकीत तिकीट देऊन निवडणूक लढविण्यासाठी आग्रही असतात. हे चित्र महाराष्ट्रभर सर्वत्रच पाहायला मिळत असते. कोकणामध्येही यापेक्षा वेगळे चित्र नाही. कोकणातही काही नगर परिषदांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती; परंतु काहीवेळा निवडून येण्याच्या शक्यतेवर निवडणूक उमेदवारी देण्याचा घाट घातला जातो.

यावेळी कोकणातील रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीचे चित्र फारच रंगतदार पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये भाजप, शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी तिघांत रस्सीखेच आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात पालकमंत्री पदावरून कधी सुप्त, तर कधी उघडपणे दिसणारा संघर्ष या निवडणुकीतही दिसून येत आहे. २०२४ या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून लढलेले पक्ष आमने-सामने उभे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती झाली. गुहागर आणि देवरूख या दोन नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद भाजपला देऊन शिवसेनेने भाजपची बोळवण केली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी धूर्तपणे रत्नागिरीत भाजपशी युती करून निवडणुकीतील डोकेदुखी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकच काय राजापूर नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेला भाजपने आपल्या पक्षाचा कार्यकर्त्या कोलेकर यांना शिंदे सेनेत पाठवून निवडणुकीसाठी उभे केले आहे. चिपळूण नगर परिषदेत तर माजी नगराध्यक्ष आणि माजी आमदार रमेश कदम निवडणूक लढवत आहेत. चिपळूणमध्ये परंपरागत विरोधक असलेल्या उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांना पाठिंबा दिला. यातही रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात उबाठातील गटबाजीही या निवडणुकीच्या निमित्ताने उघड झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आ. भास्कर जाधव यांचे कान टोचल्याचेही ऐकायला मिळाले. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत आणि इतर अशी गटबाजी कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आहे. तशी ती रत्नागिरीतही आहे. यामुळेच चिपळूणमध्ये माजी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात माध्यमांसमोर उबाठाचे आ. भास्कर जाधव यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. माजी खासदार राऊत कसे गटबाजीचे राजकारण करतात यावरही आ. भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चिपळूणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांनीही या निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय घेतला. खेडमध्येही माजी मंत्री रामदास कदम आणि भाजपात नुकतेच प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यातला संघर्ष कोकणाला नवा नाही; परंतु संयमी असलेल्या गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनीही वैभव खेडेकर यांच्याशी जुळवून घेत युतीने निवडणूक लढवली जात आहे. रत्नागिरी नगर परिषदेत युती विरुद्ध उबाठा अशी लढत होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बशीर मुर्तझा यांची एन्ट्री महत्त्वाची मानली जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या वेशीपर्यंत भाजप-शिवसेनेची युती झाली ती सिंधुदुर्गात होऊ शकली नाही. भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे हे सिंधुदुर्गात युती व्हावी या मताचे होते; परंतु सिंधुदुर्गात भाजप-शिवसेना युती न होता स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला गेला. भाजपकडून या निवडणुकीची धुरा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे सांभाळत आहेत, तर शिवसेना शिंदे गटाची धुरा माजी मंत्री आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे सांभाळत आहेत, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचेही सिंधुदुर्गात तीन-चार दौरे झाले. सावंतवाडी नगर परिषदेत राजघराण्याच्या सुनबाई श्रद्धाराजे भोसले निवडणूक लढवत आहेत. राजघराण्यातील मधल्या अनेक वर्षांच्या कालावधीनंतर राजकारणात झालेल्या या एन्ट्रीने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले या नगर परिषदांच्या आणि कणकवली नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात जेव्हा केव्हा निवडणुका होतात तेव्हा त्या निवडणुकांमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी सिंधुदुर्ग राहिला आहे. यावेळीही चर्चा त्याच पद्धतीने होत आहे. याचे कारणही तसेच आहे. सिंधुदुर्गातील निवडणुकीत भाजपचे नेतृत्व करणारे मंत्री नितेश राणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार निलेश राणे आपापल्या पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पक्षाची भूमिका मांडत आहेत. राजकारणामध्ये कोणताही पक्ष आपली रेषा मोठी करण्याचा प्रयत्न करत असतो. तसाच प्रयत्न मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्याकडून या निवडणुकीत होत आहे.

पक्षीय राजकारणात निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जात विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आजवर आपण काय केलं आणि पुढील पाच वर्षांत आपण शहराच्या विकासासाठी काय करणार आहोत याचं नियोजन आणि शहर विकासाचा आराखडा, शहराचं भविष्यकालीन व्हिजन जनतेसमोर मांडणे आवश्यक असते. शहराच्या विकासाच्या मांडणीवर शहर भविष्यात कसं असेल हे जनतेसमोर येईल. निश्चितपणे लोकही ५ वर्षांत कोणती कामे करण्यात आली, याचं मोजमापही करतील. कोकणातील या निवडणुकीतही कोणता पक्ष जिंकेल कोणता पक्ष हरणार यावर जिल्हा परिषदेचं भवितव्य बिलकूल अवलंबून नाही. याचं कारण शहरी आणि ग्रामीण असा फरक असणारच. शहरांचे प्रश्न वेगळे आहेत. ग्रामीण भागाच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुका या वेगवेगळ्या पातळीवरच्या राहतात. मात्र, या निवडणुकीत उबाठा शोधावी लागेल अशी स्थिती आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीत आहे; परंतु महाविकास आघाडी कोकणात आजही चाचपडत आहे. कोकणातील थंडी गायब झाली आहे. राजकीय वातावरणाने मात्र कोकण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

- संतोष वायंगणकर

Comments
Add Comment