Monday, December 1, 2025

नौदल वेगाने आत्मनिर्भर होत आहे

नौदल वेगाने आत्मनिर्भर होत आहे

‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या १२८ व्या भागात रविवारी भारतात खेळांची प्रगती, विंटर टुरिझम, व्होकल फॉर लोकल यासोबतच वाराणसीमध्ये होणाऱ्या काशी-तमिळ संगममचा उल्लेख केला. भारतीय खेळांसाठी हा महिना शानदार राहिला. याची सुरुवात महिला संघाच्या आयसीसी महिला विश्वचषक विजयाने झाली. भारताला राष्ट्रकुल खेळांच्या यजमानपदाचीही घोषणा झाली. टोकियोमध्ये झालेल्या डेफ ऑलिम्पिक्समध्ये भारताने विक्रमी २० पदके जिंकली. महिला कबड्डी संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला आणि बॉक्सिंग कपमध्येही भारताने २० पदके मिळवली.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, २६ नोव्हेंबर रोजी 'संविधान दिना'निमित्त सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात होणाऱ्या कार्यक्रमांची शानदार सुरुवात झाली. २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिरावर धर्मध्वजाचे आरोहण झाले. याच दिवशी कुरुक्षेत्रातील ज्योतिसर येथे पांचजन्य स्मारकाचे लोकार्पण झाले.

व्होकल फॉर लोकल स्वीकारण्याचे आवाहन: पंतप्रधानांनी सांगितले की ते नेहमी व्होकल फॉर लोकलबद्दल बोलतात. जी -२० मध्येही त्यांनी हीच भावना ठेवून परदेशी नेत्यांना भारतीय हस्तकलेची भेट दिली. दक्षिण आफ्रिकेला नटराज प्रतिमा, कॅनडाला चांदीचा घोडा, जपानला चांदीचे बुद्ध, इटलीला चांदीचा आरसा आणि ऑस्ट्रेलियाला पितळी उरळी. ते म्हणाले की, देश आता स्वदेशी उत्पादने स्वीकारत आहे. दुकानदार आणि तरुणांनीही ते स्वीकारले आहे. त्यांनी सण आणि नवीन वर्षाच्या खरेदीमध्येही व्होकल फॉर लोकल स्वीकारण्याचे आवाहन केले.

नौदल वेगाने आत्मनिर्भर होत आहे: पंतप्रधानांनी सांगितले की, भारताची सुरक्षा मजबूत झाल्यावर प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटतो. अलीकडेच आयएनएस माहेला नौदलात समाविष्ट करण्यात आले. याची स्वदेशी रचना चर्चेत राहिली आणि पुडुचेरी-मालाबारमधील लोक या नावामुळे आनंदी झाले, कारण हे ऐतिहासिक ठिकाण माहेवर आधारित आहे. याच्या क्रेस्टमध्ये उरुमी आणि कलारिपयट्टच्या पारंपरिक तलवारीसारखी झलक आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, नौदल वेगाने आत्मनिर्भर होत आहे. ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जाईल.

पंतप्रधानांनी सांगितले की, मधामागे लोकांची मेहनत आणि निसर्गाचा समन्वय दडलेला असतो. जम्मू-काश्मीरमधील पांढरा रामबन सुलाई मध आता जीआय टॅग मिळाल्यानंतर देशभरात प्रसिद्ध झाला आहे. कर्नाटकातील पुत्तूर आणि तुमकुरु येथील संस्थांनी आधुनिक प्रक्रिया, पॅकेजिंग आणि मधमाशी पेट्या देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले आहे. नागालँडमध्ये उंच खडकांमधून धोकादायक पद्धतीने मध गोळा केला जातो. देशात मध उत्पादन आता दीड लाख मेट्रिक टन पार केले आहे आणि निर्यात तिप्पट वाढली आहे.

भारताने ३५७ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. “१० वर्षांपूर्वीच्या तुलनेत भारतातील अन्नधान्य उत्पादनात १० कोटी टनांनी वाढ झाली आहे.” त्यासोबतच पुढे बोलताना मोदींनी पर्यटनाचा विषय काढला. त्यांनी पर्यटनाविषयी बोलताना,”या हंगामात उत्तराखंडमधील हिवाळी पर्यटन मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित करत आहे. औली, मुनस्यारी, चोपटा आणि देयारा ही ठिकाणे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. पिथोरागड जिल्ह्यातील १४,५०० फूटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या आदि कैलास येथे राज्यातील पहिली हाय अल्टिट्यूड अल्ट्रा रन मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. देशातील १८ राज्यांतील ७५० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. पंतप्रधानांनी ही राज्याच्या पर्यटन आणि क्रीडा उपक्रमांसाठी एक मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment