मुंबई (प्रतिनिधी) : गुगल मॅप अॅपमध्ये आता नवीन पॉवर सेव्हिंग मोड उपलब्ध झाला असून तो सुरुवातीला फक्त पिक्सेल १० सिरीजच्या स्मार्टफोनसाठी जारी करण्यात आला आहे. हा मोड नेव्हिगेशनदरम्यान बॅटरीची बचत करण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे. नोव्हेंबर पिक्सेल फीचर ड्रॉप अंतर्गत हे फीचर प्रथम सादर झाले होते आणि आता अधिक यूजर्सपर्यंत पोहोचत आहे. या मोडमध्ये गुगल मॅप ब्लॅक-अॅण्ड-व्हाईट इंटरफेसवर स्विच होते, स्क्रीनची ब्राइटनेस व रिफ्रेश रेट कमी केला जातो आणि फक्त आवश्यक नेव्हिगेशन सूचना स्क्रीनवर दिसतात. त्यामुळे लांब ड्राइव्हमध्ये बॅटरीचा वापर लक्षणीयरीत्या कमी होतो. हा पॉवर सेव्हिंग मोड केवळ पिक्सेल १०, पिक्सेल १० प्रो, पिक्सेल १० एक्सएल आणि पिक्सेल १० प्रो फोल्ड या मॉडेल्सवरच कार्यरत आहे. तसेच तो फक्त ड्रायव्हिंग मोडमध्येच काम करतो. वॉकिंग किंवा बाइकिंग नेव्हिगेशनसाठी हा मोड उपलब्ध नाही.






