Monday, December 1, 2025

निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज

निवडणुकीसाठी  मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज

एकूण २५,००० बॅलेट युनिट आणि २०,००० कंट्रोल युनिट महानगरपालिकेच्या ताब्यात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरीता २० हजार कंट्रोल युनिट आणि २५ हजार बॅलेट युनिट मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झाली आहेत. या कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची साठवणूक विक्रोळी आणि कांदिवली येथील महानगरपालिकेच्या गोदामात कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण प्रक्रियेवेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेसाठी एकूण २० हजार कंट्रोल युनिट आणि २५ हजार बॅलेट युनिटचे वितरण केले आहे. प्राप्त झालेल्या या कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांची साठवणूक विक्रोळी आणि कांदिवली येथील महानगरपालिका गोदामात करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या इव्हीएम गोदाम, वर्षा नगर, मुंबई महानगरपालिका शाळा संकुल, तळमजला, वीर सावरकर मार्ग, विक्रोळी पार्क साईट, विक्रोळी (पश्चिम) येथे १० हजार ८०० कंट्रोल युनिट आणि १३ हजार ५०० बॅलेट युनिटची साठवणूक करण्यात आली आहे. तर, मुंबई महानगरपालिका इव्हीएम गोदाम, महानगरपालिका इमारत, तळमजला, संस्कृती संकूल, ए विंग, सेंट लॉरेन्स हायस्कूल जवळ, ९० फूट मार्ग, ठाकूर संकूल, कांदिवली (पूर्व) येथे ९ हजार २०० कंट्रोल युनिट आणि ११ हजार ५०० बॅलेट युनिटची साठवणूक करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासन सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी सज्ज आहे. त्यासाठी विविध टप्पेनिहाय आखणी करण्यात आली आहे. महत्वाचा टप्पा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची उपलब्धता होय. हा टप्पा आता पूर्ण झाला आहे. सर्व संबंधितांशी समन्वय आणि नियोजनपूर्वक तयारी करून महानगरपालिकेने विक्रोळी आणि कांदिवली येथील गोदामात कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची साठवणूक केली आहे. या दोन्ही ठिकाणी महानगरपालिका सुरक्षा यंत्रणेसह पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.

Comments
Add Comment