दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये
डोंबिवली : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह भोईर यांच्या पत्नी सरोज भोईर, मनसेचे उपशहर जिल्हाध्यक्ष श्रीकांत वारंगे, अशोक म्हात्रे, संदीप म्हात्रे, सचिन सणस, काशिनाथ भोईर, गुरुनाथ मांजरेकर यांच्यासह कल्याण-डोंबिवलीतील शेकडो मनसैनिकांचा समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज त्यांनी पक्षप्रवेश केला. चव्हाण यांनी पक्षात सर्वांचे स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
''आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. कार्यकर्त्यांशी असणारी नाळ जपणारे, राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या अडचणींमध्ये खंबीरपणे साथ देणारे आमचे मित्र प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांच्या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीतील भाजपची ताकद वाढली आहे'', असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष प्रियाताई जोशी, जुनी डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, युवा नेते अनमोल म्हात्रे व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.






