नवी दिल्ली (वृत्तसंस्था ): दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी राज्यसभेत लेखी उत्तरातून दिली आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले.आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काही महत्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा पार पडली. यावेळी केंद्र सरकारने दिल्लीसह आदी महत्वाच्या विमानतळाच्या संदर्भातील महत्वाची माहिती सभागृहात देण्यात आली. दिल्ली विमानतळासह आणखी काही प्रमुख विमानतळावरील विमानांच्या जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात आल्याच्या घटनांची माहिती केंद्र सरकारने सभागृहात दिली. गेल्या काही महिन्यांत दिल्लीसह देशभरातील काही महत्वाच्या विमानतळावरील फ्लाइट्सच्या जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात आल्याच्या घटना घडल्याचे केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आले. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात हा खुलासा केला आहे. ही माहिती देताना मंत्री राम मोहन नायडू यांनी या घडलेल्या घटनांची माहिती आणि त्यानंतर या समस्या दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देखील संसदेत दिली. यामध्ये दिल्ली, कोलकाता, अमृतसर, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई येथील विमानतळांचा समावेश आहे.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या काही विमानांनी रनवे १० वर उपग्रह-आधारित लँडिंग प्रक्रिया वापरताना जीपीएस स्पूफिंगची तक्रार नोंदवली होती. पण नेव्हिगेशन सिस्टम वापरणाऱ्या इतर धावपट्ट्यांवर ऑपरेशन्सवर परिणाम झाला नाही, याकडे मंत्री राम मोहन नायडू यांनी लक्ष वेधले आहे.






