पालघर, वाडा, जव्हारमध्ये तिरंगी लढत
पालघर : नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. प्रचारतोफा आज (ता.१) थंडावणार असून, उद्या (ता.२)मतदान होणार आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठाही या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे. जिल्ह्यातील पालघर, वाडा आणि जव्हार येथील निवडणुकीमध्ये तिरंगी होत असल्याचे चित्र आहे. डहाणू येथे मात्र दोनच उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे.
पालघर नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपकडून कैलाश म्हात्रे, शिवसेना (शिंदे गट) उत्तम घरत, शिवसेना (उबाठा) उत्तम पिंपळे, काँग्रेस कडून ॲड. प्रीतम राऊत आणि दोन अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीत मुख्य लढतीबाबत शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन राजकीय पक्षांचीच चर्चा जास्त होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पालघर येथे जाहीर सभा घेतली आहे.
शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम घरत यांच्यासह सर्व उमेदवारांसाठी प्रचार मोहीम राबविली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालघर येथील नाराज पदाधिकाऱ्यांचा वर्ग घेत त्यांची नाराजी दूर केली आहे. खासदार डॉ. हेमंत सवरा हे देखील नगराध्यक्षसह जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी पालघर येथे तळ ठोकून आहेत. डहाणू येथे भाजपचे उमेदवार भरत राजपूत यांच्या विरुद्ध शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार राजू माच्छी यांच्यात सरळ लढत होत आहे. या ठिकाणी शिवसेना (उबाठा) आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. जव्हार वाडा या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, या निवडणुकीसाठी सोमवारी रात्री प्रचार संपणार आहे. त्यामुळे सोमवारी सर्व उमेदवारांच्या शेवटच्या प्रचार रॅली होणार आहेत. मंगळवारी मतदान होणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.






