रवींद्र तांबे
भारतीय संविधानाचे कलम ३२६ मध्ये सुधारणा करून २१ वर्षांवरून १८ वर्षं पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. तेव्हा देशातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही नागरिकाला मतदान करता येणार आहे. हा भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेला मूलभूत अधिकार असून याची जाणीव मतदारांना निवडणुकांपूर्वी करून देणे गरजेचे असते. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी देशात साजरा करण्यात आला. मात्र मागील ७५ वर्षांत भारतीय संविधानाबाबत जागरूकता व्हायला पाहिजे होती ती झालेली दिसत नाही. त्यामुळे लोकांचे घटनात्मक अधिकार व त्यांच्या कर्तव्यांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी 'घर घर संविधान' या कार्यक्रम २६ जानेवारी २०२६ पर्यंत आपल्या राज्यात राबविला जात आहे.
महाराष्ट्र राज्यात २४७ नगर परिषदांपैकी २४६ नगर परिषदांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये १० नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदा असून २३६ नगर परिषदांची मुदत संपली आहे, तर राज्यातील १४७ नगरपंचायतींपैकी ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यात १५ नवनिर्मित नगरपंचायतींचा समावेश आहे. मतदाराला आपले अमुल्य असे एक मत नगरपंचायतींच्या सभासदासाठी व एक मत नगराध्यक्षांसाठी अशी दोन मते देता येणार आहेत. नगर परिषदेमध्ये तीन ते चार मते देता येणार आहेत. राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायत यांच्या भविष्याचा विचार करून नि:पक्षपातीपणे काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. जेणेकरून ते आपल्या कारकिर्दीत चांगल्याप्रकारे काम करतील. राज्यात २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १३,३५५ मतदार केंद्रांवर मतदान होणार आहे. जरी मतदान रात्री ९ वाजेपर्यंत चालले तरी मतदार राजाने ५.३० नंतर येऊन चालणार नाही. नगर परिषदा व नगरपंचायत निवडणुकीसाठी १ कोटी ७ लाख ३३५५ एकूण मतदार आहेत. यामध्ये ५३ लाख ७९ हजार ९३१ पुरुष मतदार, ५३ लाख २२ हजार ८७० महिला मतदार आणि ७७५ इतर मतदार आहेत. यासाठी मतदार राजाला जागृत करणे गरजेचे आहे. सध्या राज्यात नगर परिषदा व नगरपंचायत निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आल्यावर काय करणार आहे त्याचा जाहीरनामा मतदार राजाला जाहीररीत्या सांगत आहे. तर उमेदवार एकमेकांवर दोष-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यामुळे काही वेळा मतदार राजा संभ्रमात पडतो. अशावेळी राज्यातील मतदार राजाला जागृत केले पाहिजे. त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयोग मतदार जागृती अभियान राबवीत असतात.
मतदानादिवशी मतदान केंद्रावर मतदार राजाला मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र किंवा मतदार स्लीप त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. आपल्या देशात लोकशाही व्यवस्थेत दर पाच वर्षांनी निवडणुका होत असतात. राज्यात आतापर्यंत एकाही केंद्रात १०० टक्के मतदान झालेले नाही. काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली दिसत आहे. मात्र राज्याच्या हितासाठी त्याहीपेक्षा जास्त मतदारांची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. यातूनच चांगले प्रतिनिधी मिळू शकतात. यासाठी मतदारांची नाराजी लोकप्रतिनिधींनी दूर करणे आवश्यक आहे. फोडाफोडी, जोडाजोडी आणि वस्त्रहरण या पलीकडे काही लोकप्रतिनिधी सोडले, तर काहीच करीत नाहीत. यात विकास निधी बाजूला राहतो. आमच्यात या, विकास निधी कमी पडायला देणार नाही, यात पाच वर्षे केव्हाच निघून जातात. यामुळे विकासाकडे दुर्लक्ष होतो. त्यामुळे उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा निवडून आल्यावर सामान्य माणसांना न्याय मिळेल काय, याचा विचार करून मतदार राजाने बिनधास्तपणे मतदानादिवशी मतदान करणे गरजेचे असते. कारण मतदारच नवीन सरकार सत्तेवर आणू शकतात किंवा पाडू शकतात. इतकी ताकद एका मतात आहे. तेव्हा निवडणुकीत मतदारांची आकडेवारी वाढणे आवश्यक आहे. यासाठी मतदार जागृती होणे गरजेचे आहे. आजही अनेक मतदार मतदान करीत नाहीत. त्यामुळे चुकीचे लोकप्रतिनिधी निवडले जातात. याचा परिणाम विकास योग्य पद्धतीने होत नाही. त्यासाठी जास्तीतजास्त मतदारांनी मतदान करायला हवे म्हणजे योग्य प्रतिनिधी निवडला जाईल.
आपल्या देशात लोकशाही असल्याने मतदाराला अतिशय महत्त्व आहे. मतदारामुळे आपण यीग्य प्रतिनिधी निवडू शकतो. याचा परिणाम सर्वसाधारण नागरिकांचे कल्याण होण्याला मदत होते. तेव्हा मतदार राजांनी आपले मतदान करून मतदानाचे मूलभूत कर्तव्य बजावावे. मतदार हा लोकशाहीचा पाया आहे. मात्र अजून अनेक लोक मतदानाचे महत्त्व पटवून घेत नाहीत. त्यासाठी मतदार जागृती जास्त महत्त्वाची असते. मतदानादिवशी काही लोक घरी राहणे पसंत करतात. नाव नोंदणी करीत नाहीत. सध्या तरुण वर्ग व ज्येष्ठ लाडक्या बहिणी यांच्यात उदासीनता दिसून येते. तेव्हा शाळा, महाविद्यालये, समाज माध्यमे, प्रसार मोहिमा, रॅली, पोस्टर व व्याख्याने इत्यादींच्या माध्यमातून मतदार जागृती करावी. मतदानामुळे आपल्या देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांनी मतदान केले पाहिजे. तेव्हा आपल्या विकासाच्या भवितव्यासाठी मतदार जागृती खूप महत्त्वाची असते. महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्या देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान करूया. यासाठी मतदार जागृती अतिशय महत्त्वाची आहे.