बाहेरगावच्या प्रवाशांंमध्ये संभ्रम
डोंबिवली : गेल्या वर्षापासून डोंबिवली स्थानकाचे नूतनीकरण, डागडूजी, प्लेटफॉर्म रुंदीकरण, वाढीव जिना, सरकते जिने पत्र्याचे शेड असे अनेक काम सुरू आहेत. मात्र हे काम करत असताना रेल्वे प्रशासनाकडून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे जणू नव्याने नामकरण केले गेले आहे. स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला एकूण आठ प्रवेशद्वार आहेत. एकाही प्रवेशद्वारावर कुठेच 'डोंबिवली' असा उल्लेख नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. आपण नक्की कोणत्या स्थानकाजवळ आहोत असा प्रश्न ते विचारतात.
आठही प्रवेशद्वारांवर नाट्यनगरी, नृत्यनगरी, क्रिडा नगरी, साहित्य नगरी, उद्योग नगरी, संगीत नगरी, एकता नगरी, कला नगरी असे लिहिले गेले आहे. ही नावे म्हणजे डोंबिवली शहराला मिळालेल्या उपमा आहेत. उपमा मिळाल्या म्हणून आपण मूळ नाव मिटवू शकत नाही.
ठाणे ग्रामीण भागातील प्रमोद कांबळे यांनी मध्य रेल्वे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) हिरेश मीना यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. लवकरात लवकर डोंबिवली स्थानकाबाहेरील कमावर डोंबिवली हे मूळ नाव सुद्धा लिहावे. अनेक दिवसांपासून रेंगाळत चाललेली कामे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावी अशी विनंती करून सांगितले. अन्यथा शिवसेना स्टाइल तीव्र आंदोलन करू असा इशारादेखील देण्यात आला. गेल्या वर्षी निवडणुकीच्या दरम्यान अर्धवट काम झाले असताना रेल्वे प्रशासनाने आमदारांना डोंबिवली स्थानक नूतनीकरण लोकार्पण करण्याची परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.


