नवी दिल्ली : दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला येत्या डिसेंबर महिन्यात १० दिवसांसाठी सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. ५ ते १४ डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी लाल किल्ला पूर्णपणे बंद असणार आहे.
भारत पहिल्यांदाच ‘अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणा’संदर्भातील युनेस्कोच्या २०व्या सत्राचे आयोजन करत आहे. यासाठी लाल किल्ला हे ठिकाण निवडण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या सहसंचालक नंदिनी भट्टाचार्य साहू यांनी सांगितले की, ‘अमूर्त सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासंदर्भातील सत्र ८ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
या प्रतिष्ठित जागतिक कार्यक्रमात २४ हून अधिक देशांचे प्रतिनिधी व एक हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होतील, ज्यामध्ये सांस्कृतिक वारसा, संवर्धन व जागतिक वारसा व्यवस्थापनाशी संबंधित तज्ज्ञ आणि अधिकारी यांचा समावेश असणार आहे.






