मुंबई : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सोमवार १ डिसेंबर २०२५ पासून पदभार स्वीकारणार आहेत. राज्याच्या प्रशासनातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून त्यांची मुख्य सचिव या पदावर निवड झाली आहे. राजेश अगरवाल यांचा कार्यकाळ पंधरा महिन्यांचा असेल. यामुळे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, ओ. पी. गुप्ता आणि दीपक कपूर या चार प्रशासकीय अधिकाऱ्यांची संधी हुकल्याची चर्चा आहे.
राजेश अगरवाल हे महाराष्ट्र कॅडरचे १९८९च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी दिल्ली येथून कॉम्प्युटर सायन्समधून बी टेक ही पदवी घेतली आहे. त्यांनी अकोला आणि जळगाव येथे जिल्हाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेत उपायुक्त, महाराष्ट्र वित्त आणि आयटी विभागांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, केंद्रात आधार, जनधन, डिजीलॉकर आणि सामाजिक न्याय उपक्रमांवर काम केले आहे. राजेश अगरवाल यांनी केंद्रात अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभागात सचिव म्हणून काम केले आहे. डिजिटल प्रशासन कौशल्य, प्रशासकीय कौशल्य आणि सुधारणा-केंद्रित नेतृत्वासाठी ओळखले जाणारे राजेश अगरवाल हे १ डिसेंबर २०२५ पासून महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना यांची जून २०२५ मध्ये राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते ३० नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी राजेश अगरवाल हे राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत.






