Friday, November 28, 2025

बीएमसी गुंतवणूक घोटाळ्याच्या वादाला नवीन वळण

बीएमसी गुंतवणूक घोटाळ्याच्या वादाला नवीन वळण

मुंबई  : मुंबई महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्ताने वांद्रे येथील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास स्वस्त दरात घरे मिळतील, असे आमिष दाखवत थेट उच्चपदस्य पोलस, पालिका अधिकारी यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्यालाही गुंतवणूक करण्यास भाग पाडत तब्बल ८० कोटींची रक्कम हडपल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यानेच आरोप करणाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठविल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. गुंतवणूक घोटाळ्याच्यादरम्यान, सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी त्यांच्यावरील सर्व गंभीर आरोपांचे सविस्तर आणि अधिकृत खंडन केले. कायदेशीर प्रक्रियेनुसार, सहाय्यक आयुक्त पाटील यांनी युकेस्थित व्यावसायिक निशित पटेल यांना ४ नोव्हेंबर रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तीन दिवसांत ठोस पुरावे सादर करण्याची नोटीस बजावली. अन्यथा, ही तक्रार उच्चपदस्थ अधिकाऱ्याची बदनामी करण्याच्या उद्देशाने आहे असे गृहीत धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटीशीत नमूद केले होते.

"ही तक्रार पूर्णपणे खोटी, निराधार आणि कोणत्याही पुराव्याशिवाय आहे. हा विषय आता तपास संस्था आणि राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, असे स्पष्ट करत महेश पाटील यांनी कोणत्याही चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. घोटाळ्याभोवतीच्या आरोपांमुळे महाराष्ट्र प्रशासनातील भ्रष्टाचाराबद्दलच्या चर्चेला आणखी बळकटी मिळाली आहे. आता, पाटील यांच्या अधिकृत प्रतिक्रियेमुळे, प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे.

Comments
Add Comment