Friday, November 28, 2025

नायगाव बीडीडीवासीयांचा गृहप्रवेश लांबणीवर

नायगाव बीडीडीवासीयांचा गृहप्रवेश लांबणीवर

८६४ रहिवाशांना घरांची प्रतीक्षा

मुंबई  : वरळी बीडीडीच्या साडेपाचशे रहिवाशांना घराचा ताबा दिल्यानंतर आता नायगाव बीडीडीच्या जागेवरील ८६४ रहिवाशांना घराची प्रतीक्षा लागली आहे. मात्र त्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे. म्हाडाने ही घरे उभारली असून संपूर्ण काम झाले आहे. संबंधित इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रही (ओसी) मिळाली आहे. मात्र सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असल्याने म्हाडाला मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने चावीवाटप रखडले असल्याची चर्चा आहे.

वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून होत आहे. नायगाव बीडीडी येथील ४२ चाळींचा पुनर्विकास करून ३,३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ तर दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत. पुनर्वसन इमारत क्र. ८ मधील टॉवर क्र. ४ ते ८ या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले असून, ८६४ रहिवाशांना चावीवाटप केले जाणार आहे.

सुरुवातीला दिवाळीत संबंधित रहिवाशांना चावीवाटप करण्याचे म्हाडाचे नियोजन होते, मात्र तांत्रिक कारणामुळे ओसी न मिळाल्याने तो मुहूर्त हुकला होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओसी येताच म्हाडाने चावीवाटपाची तयारी करीत मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. त्यानुसार सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी १२ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती. मात्र काही कारणास्तव ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. त्याला आता १५ दिवस झाले तरी चावीवाटपासाठी मुख्यमंत्र्यांकडून नवी तारीख मिळालेली नाही. त्यामुळे नव्या घरांचा ताबा कधी मिळणार, याकडे बीडीडीवासीयांचे डोळे लागले आहेत.

Comments
Add Comment