टिटवाळा इंदिरा नगर, स्मशानभूमी परिसरातील प्रकार
कल्याण : टिटवाळा इंदिरा नगर, स्मशानभूमी रस्ता परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी येत नाही. तरीदेखील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका नियमित पाण्याचे बिल पाठवत आहे. हे पाण्याचे बिल तत्काळ रद्द करावे अशी मागणी संघर्ष रहिवासी संघटनेचे अध्यक्ष गणेश भाटे यांनी 'अ' प्रभागाचे सहाय्यक आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. इंदिरा नगर परिसरात मोठी लोकवस्ती असून गेली अनेक वर्षे येथे नागरिक राहतात. येथील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असून यापैकी मुख्य समस्या म्हणजे पिण्याच्या पाणी.
गेली कित्येक वर्षे जलवाहिनी नसतानादेखील कडोंमपाच्या वतीने पाण्याचे बिल पाठवले जात आहे. आता महापालिकेने याठिकाणी जलवाहिनी टाकली आहे. मात्र नळ जोडणीच दिली नाही. असे असतानादेखील पाणी बिल मात्र नियमितरीत्या येत आहे. याबाबत पालिकेला वारंवार सुचित करूनदेखील पालिका पाणी बिल पाठवत आहे. येथील नागरिकांना टिटवाळा स्टेशन येथून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. याबाबत संघर्ष रहिवासी संघटना इंदिरानगरचे अध्यक्ष गणेश भाटे यांचा पाठपुरावा सुरू असून सर्व पाणी बिल रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर संबंधित सहाय्यक आयुक्तांनी लवकरच सर्व्हे करू असे सांगितले आहे.






