Thursday, November 27, 2025

मल जल प्रक्रिया केंद्रांची कामे जलदगतीने

मल जल प्रक्रिया केंद्रांची कामे जलदगतीने

केंद्र उभारणीच्या कामाच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देश

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याची कार्यवाही प्रगतिपथावर असून अतिरिक्‍त मनुष्यबळ उपलब्ध करून कामे तीन सत्रांत (शिफ्ट) अखंडितपणे सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अभिजित बांगर यांनी दिले आहेत.नवीन मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता व सागरी जीवनामध्ये सुधारणा होणार असल्‍याचेही बांगर यांनी अधोरेखित केले.

मुंबईतील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिने महानगरपालिकेकडून एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत. अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका मुख्‍यालयात या कामांचा प्रकल्‍पनिहाय आढावा गुरुवारी २७ नोव्हेंबर रोजी घेतला. त्‍यावेळी त्‍यांनी हे निर्देश दिले. प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) अशोक मेंगडे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते, प्रकल्‍प व्‍यवस्‍थापन सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.

मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्या वतीने वरळीमध्ये ५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन, वांद्रे येथे ३६० दशलक्ष लीटर प्रतिदिन, मालाडमध्ये ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन, घाटकोपरमध्ये ३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन, धारावीमध्ये ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन, भांडुपमध्ये २१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन आणि वेसावे (वर्सोवा) येथे १८० दशलक्ष लीटर प्रतिदिन याप्रमाणे एकूण ७ केंद्र उभारणीची कार्यवाही वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांद्वारे दररोज २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया केली जाणार आहे. या सातही मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची भौतिक कामे वेगाने सुरू आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार, घाटकोपर, वेसावे (जुलै २०२६), भांडुप (ऑगस्‍ट २०२६), वरळी, वांद्रे, धारावी (जुलै २०२७) आणि मालाड मलजल प्रक्रिया केंद्र (जुलै २०२८) पूर्णत्‍वाचा कालावधी आहे. या विहित कालमर्यादेतच कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश बांगर यांनी दिले.

मलजल प्रक्रिया कार्य अंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह १ हजार २०० दशलक्ष लीटर मलजलावर तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहे. विविध प्रयोजनार्थ या पाण्‍याचा पुनर्वापर केला जाणार आहे. तसेच, टप्‍प्‍याटप्‍प्‍याने १०० टक्‍के मलजलावर तृतीय स्तरीय प्रक्रिया करून विविध प्रयोजनार्थ पुनर्वापर करण्‍याचे नियोजन आहे. नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल, असेही बांगर यांनी नमूद केले.

मलजल प्रक्रिया केंद्र उभारणी कामातील विविध आव्‍हानांविषयी बांगर म्‍हणाले की, भांडुप, घाटकोपर, वेसावे आणि मालाड येथील मलजल प्रक्रिया केंद्र अस्तित्त्वातील खारक्षेत्र मध्‍ये उभारले जात आहेत. कांदळवनामुळे मालाड मलजल प्रक्रिया केंद्र उभारणी कामाला परवानगी मिळण्‍याकामी विलंब झाला. मात्र, सद्यस्थितीत दररोज ३००० मनुष्‍यबळ प्रकल्‍पस्‍थळी कार्यरत आहे. अत्‍यंत गतीने काम करून केवळ एका वर्षात ४० टक्‍के भौतिक कामे पूर्ण झाली आहेत. तर, जागेची उपलब्‍धता कमी असल्‍याने वैशिष्‍ट्यपूर्ण रचनेच्‍या बहुमजली इमारतीत धारावी मलजल प्रक्रिया केंद्र उभारले जात आहे. या केंद्रातून बाहेर पडणारे फेरप्रक्रियायुक्‍त पाणी मिठी नदीत सोडले जाणार आहे. वांद्रे पश्चिम परिसरात सागरी सेतू नजीक वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे. प्रकल्पाची भौतिक प्रगती समाधानकारक आहे. या ठिकाणी छतावरील बाग आणि व्‍ह्युविंग टॉवर अशा वैशिष्ट्यपूर्ण वास्तूदेखील उभारण्‍याचे नियोजन असल्‍याचे अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी सांगितले.

Comments
Add Comment