Thursday, November 27, 2025

महिला प्रिमीअर लीग २०२६ च्या तारखा जाहीर

महिला प्रिमीअर लीग २०२६ च्या तारखा जाहीर
नवी दिल्ली : महिला प्रीमिअर लीग २०२६ हंगामाच्या तयारीला वेग आला असून गुरूवारी नवी दिल्लीत मेगा ऑक्शन पार पडत आहे. पाचही फ्रँचायझींनी ऑक्शनपूर्वी एकूण १८ खेळाडूंना कायम ठेवले आहे. महिला प्रीमिअर लीग २०२६ चे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. यानुसार स्पर्धेची सुरुवात ९ जानेवारी २०२६ रोजी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर पहिल्या सामन्याने होणार आहे. तर फायनल ५ फेब्रुवारी २०२६ रोजी वडोदरा येथे रंगणार आहे. या वेळापत्रकातील मोठा बदल म्हणजे महिला प्रीमिअर लीग आता जानेवारीत सुरू होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमांशी संघर्ष टाळण्यासाठी वेळेत बदल करण्यात आला असून, संपूर्ण हंगाम फक्त नवी मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामासाठी १९४ भारतीय आणि ८३ परदेशी अशा एकूण २७७ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. मात्र, त्यापैकी फक्त ७३ खेळाडूंनाच करारबद्ध करण्याची परवानगी आहे आणि त्यापैकी २३ जागा या परदेशी खेळाडूंना राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सोफी डिव्हाईन, सोफी एक्लेस्टन, एलिसा हिली, अमेलिया केर, मेग लॅनिंग, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग आणि लॉरा वॉलव्हार्ड्ट या नावाजलेल्या खेळाडूंचा Marquee यादीत समावेश आहे. त्यामुळे या खेळाडूंसाठी संघांमध्ये जोरदार बोली लावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वूमेन्स प्रीमियर लीगच्या खेळाडू लिलावात भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा सर्वाधिक किमतीची भारतीय खेळाडू ठरली. श्रेणी टप्प्यात उत्तर प्रदेश योद्ध्यांनी तिच्यासाठी ३ कोटी २० लाख रुपये इतकी हक्क राखून बोली लावून तिला पुन्हा संघात स्थान दिले. भारताच्या महिला क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दीप्तीवर संघाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला. परदेशी खेळाडूंमध्ये न्यूझीलंडच्या अमेलिया केरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईच्या संघाने तिला ३ कोटी रुपये देत आपल्या ताफ्यात कायम ठेवले. उपयुक्त फलंदाजी व अचूक फिरकीगोलंदाजी या गुणांच्या जोरावर केरची निवड ठरली. लिलावाच्या जलदगती टप्प्यात भारताची अनुभवी गोलंदाज शिखा पांडे सर्वांत महागडी ठरली. उत्तर प्रदेश योद्ध्यांनी तीला २ कोटी ४० लाख रुपये देत आपल्या संघात घेतले. तिच्या अचूक गोलंदाजीचा अनुभव संघाला महत्त्वाचा ठरणार आहे. या तिन्ही खेळाडूंच्या मोठ्या बोलीमुळे आगामी स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. महिला प्रीमियर लीगमधील या लिलावामुळे भारतीय महिला क्रिकेटचा वाढता दर्जा पुन्हा अधोरेखित झाला आहे.
Comments
Add Comment