मुंबई : अनेक दिवसांपासून मोबाईल युजर्स हे स्पॅम कॉलबाबत तक्रारी करत होते. अनेकांना अनोळखी नंबरवरून कॉल यायचे आणि त्यांना कारण नसताना एखाद्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसच्या खरेदीबाबत गळ घातली जात होती. इतकेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून स्पॅम कॉलमार्फत डिजिटल फ्रॉड आणि लुटीचे प्रमाण देखील वाढले होते. दरम्यान आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने या स्पॅम कॉलवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मात्र ट्रायने या समस्येच्या मुळात जाऊन त्यांच्यावर कशी कारवाई करता येईल याचा विचार करायला हवा.
ट्रायने गेल्या वर्षात स्पॅम कॉल्सविरूद्ध कारवाई करत जवळपास २१ लाख मोबाईल नंबर बंद केले आहेत. त्या नंबर्सना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. या प्रकारच्या कारवाईची गरज अनेक दिवसांपासून होती. मात्र फोनवरून फ्रॉड करणारे आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अनेकांनी नवनवीन शक्कल लढवली आहे. एखाद्या व्यक्तीनं कंटाळून एक नंबर ब्लॉक केला तर त्याला दुसऱ्या नंबरवरून कॉल करून त्रास दिला जातो. त्यामुळे आता याला आळा घालण्यासाठी एका तांत्रिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. यात सामान्य ग्राहकांना कोणत्याही वस्तू किंवा सेवा यांचा प्रचार किंवा इतर उद्येशाने केले जाणाऱ्या कॉल्सवर नियंत्रण ठेवता येईल. तसेच नको असलेल्या कॉलद्वारे होणाऱ्या डिजीटल फ्रॉड, सायबर क्राईम या गुन्ह्यांपासून देखील ग्राहकाचे संरक्षण होईल.