'गुन्हा आणि शिक्षा' हे मानवी समाजाचे एक अविभाज्य चक्र आहे. जिथे गुन्हा घडतो, तिथे त्या गुन्ह्याला आळा घालणारी यंत्रणा आणि न्याय देणारी व्यवस्था अस्तित्वात असते; परंतु, गुन्हा केल्यानंतर प्रत्येक गुन्हेगार शिक्षेला सामोरे जाण्यास तयार असतोच असे नाही. खरं तर, बहुतांश गुन्हेगारांचा पहिला प्रयत्न पकडले न जाणे, कायद्याच्या कचाट्यातून सुटणे हाच असतो. पोलीस प्रशासनापासून स्वतःला लपवण्यासाठी गुन्हेगार अनेक डावपेच अवलंबतात. यामागे एक विशिष्ट प्रकारची मानसिकता आणि काही वेळा नियोजबद्ध रणनीती असते. हा लेख गुन्हेगारांच्या याच पद्धती मागील मानसिकतेचा सविस्तर आढावा घेतो.
गुन्हेगारांनी अवलंबलेल्या प्रमुख पद्धती आणि क्लृप्त्या याचा अभ्यास सगळ्यांना असणे गरजेचे आहे. गुन्हेगार स्वतःला लपवण्यासाठी गुन्ह्याच्या स्वरूपानुसार, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आणि उपलब्ध संसाधनांनुसार विविध मार्गांचा अवलंब करतात. यांचे ढोबळमानाने पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार तत्काळ ते शहर, राज्य सोडून पळून जातात, ते अशा ठिकाणी आश्रय घेतात जिथे त्यांची ओळख पटणे कठीण असते. ही ठिकाणे अनेकदा सामान्य वस्तीत, अपरिचित ठिकाणी किंवा दुर्गम भागात असतात, जिथे पोलीस सहजासहजी पोहोचू शकत नाहीत. काही गुन्हेगार, विशेषतः जे फारसे ओळखले गेलेले नाहीत, रेकॉर्डवर नाहीत ते पळून न जाता गर्दीच्या ठिकाणी, जसे की मोठी शहरे किंवा झोपडपट्ट्यांमध्ये सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांच्यावर कोणाचा संशय येऊ नये. सतत जागा बदलणे म्हणजेच एकाच ठिकाणी न राहता दर काही दिवसांनी किंवा आठवड्यांनी आपला मुक्काम बदलत राहणे यामुळे पोलिसांना त्यांचा मागोवा घेणे कठीण जाते. ओळख बदलण्यासाठी त्यांचा शारीरिक बदल हा एक अत्यंत जुना, पण प्रभावी मार्ग आहे. यामध्ये केसांची रचना बदलणे, केस कापणे किंवा वाढवणे, दाढी-मिशी ठेवणे किंवा काढणे यांचा समावेश होतो. बनावट नावे जसे की स्वतःची खरी ओळख लपवून नवीन नावाने वावरणे. बनावट कागदपत्रे तयार करणे, खोटे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तयार करून नवीन ओळख प्रस्थापित करणे याचा आधार गुन्हेगार घेतात.
प्लॅस्टिक सर्जरीचा आधार घेतला जातो. अत्यंत गंभीर आणि हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये, जिथे गुन्हेगाराकडे भरपूर पैसा असतो, तिथे चेहऱ्याची ओळख बदलण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा आधार घेतला जातो. तांत्रिक आणि आर्थिक क्लृप्त्यामार्फत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मोबाइलचा वापर टाळला जातो. पोलिसांसाठी मोबाइल ट्रॅकिंग हा गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो. हुशार गुन्हेगार एकतर फोन वापरणे पूर्णपणे बंद करतात किंवा डिस्पोजेबल सीम कार्ड असलेले साधे फोन वापरतात, जे वापरानंतर फेकून दिले जातात. याशिवाय अनेक नंबर वापरणे, विविध सेटिंग बदलत राहणे हा पर्याय गुन्हेगार अमलात आणतात. डिजिटल फूटप्रिंट टाळणे म्हणजेच सोशल मीडिया पूर्णपणे बंद करणे. डिजिटल पेमेंट टाळून केवळ रोख व्यवहार करणे. व्हीपीएन आणि एन्क्रिप्टेड चॅट्सचा वापर करणे. गुन्ह्यातून मिळालेला पैसा किंवा पळून जाण्यासाठी लागणारा पैसा इतरांच्या बँक खात्यांद्वारे किंवा हवालामार्गे फिरवला जातो, अनेक बँकांमध्ये बनावट नावानी अकाउंट बनवून त्याद्वारे पैशाची देवाण-घेवाण केली जाते. कायदेशीर आणि प्रक्रियात्मक डावपेच खेळणे जसे की पुरावे नष्ट करणे हा खूप प्रचलित प्रकार आहे. गुन्हा केल्यानंतर सर्वात आधी गुन्ह्याशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी नव्हतोच, तर दुसरीकडेच होतो, हे सिद्ध करण्यासाठी खोटे साक्षीदार उभे करणे किंवा तसे पुरावे तयार करणे.
सर्वांना परिचय असणारा भाग म्हणजेच अटकपूर्व जामीन. अटक होण्याची शक्यता दिसताच वकिलांमार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणे. जेव्हा पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा काही गुन्हेगार स्वतःच्या अटींवर, वकिलामार्फत आत्मसमर्पण करतात. यामुळे कारवाई किंवा 'एन्काउंटर' टाळता येईल अशी गुन्हेगाराची मानसिकता असते. गुन्हेगारांचे नेटवर्क अर्थात गुन्हेगारांना त्यांच्या नेटवर्कचा आधार असतो. हे साथीदार त्यांना लपण्यासाठी जागा, पैसा आणि माहिती पुरवतात. बहुतांशवेळा राजकीय आश्रय घेणे यासारखे प्रकार पाहायला मिळतात. काही गुन्हेगारांना राजकारण्यांचा छुपा पाठिंबा असतो, ज्याच्या आधारे ते पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. जे लोक आपल्याविरुद्ध साक्ष देऊ शकतात, त्यांना धमकावून गप्प करणे, जेणेकरून खटला उभाच राहू नये यासाठी गुन्हेगार प्रयत्न करताना दिसतात. गुन्हेगारांच्या या कृतीमागील मानसिकता लक्षात घेणे गरजेचे आहे. गुन्हेगार का लपतात? याचे उत्तर वरवर सोपे असले तरी, त्यामागे अनेक मानसिक पैलू आहेत. शिक्षेची भीती ही सर्वात मूलभूत आणि प्रबळ भावना आहे. अटक होणे, तुरुंगात जाणे, स्वातंत्र्य गमावणे, समाजातील प्रतिष्ठा आणि सन्मान गमावणे आणि कायद्यानुसार होणाऱ्या शिक्षेची भीती, गुन्हेगाराला पळून जाण्यास प्रवृत्त करते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला धोक्यात पाहते, तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया 'लढा किंवा पळा' अशी असते. या प्रकरणात, पोलीस प्रशासन हे 'धोका' असते आणि 'पळून जाणे' हा त्या धोक्यापासून वाचण्याचा मार्ग असतो. आपण व्यवस्थेपेक्षा हुशार आहोत ही भावना काही सराईत गुन्हेगारांमध्ये असते. त्यांना असे वाटते की, ते पोलीस आणि कायदेशीर व्यवस्थेपेक्षा जास्त हुशार आहेत. अनेकदा, एखादा गुन्हा घडल्यानंतर, व्यक्ती घाबरते, गोंधळते आणि पुढे काय करावे हे न सुचल्याने फक्त पळ काढते. पोलीस आणि समाज त्याचा शोध घेत राहतात. पोलिसांची फाईल बंद होते. समाजाच्या आणि कुटुंबाच्या मनातून ती व्यक्ती 'संपलेली' असते किंवा कधी कधी कुटुंबातील लोकांना सत्य माहिती असते पण समाजासाठी, पोलिसांना दाखवण्यासाठी ही व्यक्ती स्वतःला मृत घोषित करते. गुन्हेगार जेव्हा हा अत्यंत टोकाचा मार्ग निवडतो, तेव्हा त्यामागील मानसिकता भयानक असते. 'मृत्यू'चा बनाव रचणे त्यामागील प्रमुख मानसिक पैलू लक्षात घेणे गरजेचे आहे. अंतिम 'रीसेट बटण' ही या कृतीमागील सर्वात प्रबळ मानसिकता आहे. गुन्हेगाराला हे कळून चुकलेले असते, की त्याने केलेला गुन्हा गंभीर आहे. तो पकडला गेल्यास त्याला उर्वरित आयुष्य तुरुंगात काढावे लागेल. पण 'मृत' झाल्यावर तो ती ओळख पुसून टाकू शकतो. तो एका नवीन ठिकाणी, नवीन नावाने, एक सामान्य माणूस म्हणून जगण्याची अपेक्षा ठेवतो. त्याला त्याची जुनी ओळख पूर्णपणे नष्ट करायची असते. या परिस्थितीमध्ये व्यवस्थेपेक्षा आपण श्रेष्ठ असण्याचा अहंकार असतो. काही गुन्हेगार विशेषतः जे हुशार असतात, जसे की 'व्हाईट कॉलर क्रिमिनल्स' स्वतःला व्यवस्थेपेक्षा जास्त हुशार समजतात. स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून सर्वांना फसवणे, हा त्यांच्या बुद्धिमत्तेचा 'अंतिम विजय' असतो. 'मी इतका हुशार आहे की मी माझ्या मृत्यूवरही नियंत्रण ठेवू शकतो आणि पोलिसांना मूर्ख बनवू शकतो,' हा अहंकार त्याला हे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करतो. जेव्हा गुन्हेगाराला शिक्षेची किंवा गुन्हेगारी टोळीकडून होणाऱ्या प्रतिशोधाची प्रचंड भीती वाटते, तेव्हा तो हा मार्ग निवडतो.
भावनिक अलिप्तता आणि समाजविघातक प्रवृत्ती अशा लोकांमध्ये पाहायला मिळते. स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचणे हे वाटते तितके सोपे नसते. स्वतःला मृत घोषित करणे, दाखवणे असे दर्शवते की त्या व्यक्तीची स्वतःच्या कुटुंबाशी असलेली भावनिक नाळ पूर्णपणे तुटलेली आहे. स्वतःची सुटका करणे, हे त्याच्यासाठी इतरांच्या भावनांपेक्षा जास्त महत्त्वाचे असते. ही एक प्रकारची आत्मकेंद्री वृत्ती आहे. एकदा तो 'मृत' घोषित झाला की, शोध थांबतो, फाईल बंद होते आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी हे कृत्य गुन्हेगाराला फायदेशीर वाटते. स्वतःला मृत भासवणे हे केवळ पळून जाणे नाही, तर ते 'ओळखीची आत्महत्या' असते. सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाइल लोकेशन ट्रॅकिंग, डिजिटल पेमेंट रेकॉर्ड, डीएनए फॉरेन्सिक्स आणि खबऱ्यांचे जाळे या जोरावर पोलीस गुन्हेगारांचा मागोवा घेतात. गुन्हेगाराचे लपणे हे तात्पुरते असू शकते, पण कायद्याच्या कचाट्यातून कायमचे सुटणे अशक्य असते. - मीनाक्षी जगदाळे






