Thursday, January 15, 2026

घरच्या मैदानावर भारताचा पराभव; दक्षिण आफ्रिकेचा २-० ने कसोटी मालिकेत दणदणीत विजय

घरच्या मैदानावर भारताचा पराभव; दक्षिण आफ्रिकेचा २-० ने कसोटी मालिकेत दणदणीत विजय

गुवाहाटी : गुवाहाटीत झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आणि दक्षिण आफ्रिकेनं ४०८ धावांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवत मालिका २-० ने जिंकली. घरच्या मैदानावर भारताचा धावांच्या फरकाने झालेला हा आजवरचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.

पहिल्या डावात २८८ धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर पाहुण्या संघाने दुसरा डाव २६०/५ वर डिक्लीअर करत भारतासमोर तब्बल ५४९ धावांचं आव्हान ठेवलं. ट्रिस्टन स्टब्स ९३ धावांवर बाद होताच कर्णधार बावुमाने डिक्लरेशनचा निर्णय घेतला, भारतीय संघावर मानसिक दबाव वाढवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं त्यानी ओळखलं.

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयम आणि आक्रमकता यांचा योग्य ताळमेळ साधत भारतीय गोलंदाजांना सतत दबावाखाली ठेवलं. दुसरीकडे, भारताकडून अपेक्षित ब्रेकथ्रू न मिळाल्याने स्कोअरबोर्ड वेगाने वाढत गेला.

५४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजीची सुरुवातीपासूनच घसरण सुरू झाली. कर्णधार ऋषभ पंत लवकर बाद झाल्यानं संपूर्ण संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला. पहिल्याच सेशनमध्ये तीन विकेट्स गमावून भारताने फक्त ६३ धावा मिळवल्या, ज्यामुळे पराभवाची दारे मोठ्या प्रमाणात खुली झाली.

पुढे परिस्थिती आणखीच बिकट झाली. अनुभवी खेळाडू आणि युवा फलंदाज कोणीच पिचवर टिकू शकले नाही. संघ १४० धावांवर सर्वबाद झाला आणि परिणामी ४०८ धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं तब्बल २५ वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारताला मात्र घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यावेळी व्हाईटवॉशचा धक्का बसला आहे. न्यूझीलंड सोबत ३-० ने झालेल्या पराभवानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही २-० ने हरवलं.

Comments
Add Comment