गुवाहाटी : भारताच्या कसोटी संघाला दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत ४०८ धावांनी पराभूत करत मालिका २-० ने खिशात घातली. तब्बल २५ वर्षांनी भारतात मालिका जिंकण्याची ऐतिहासिक नोंद केली. या सामन्यात भारताला ५४९ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर संपूर्ण संघ केवळ १४० धावांवर कोसळला. या निकालामुळे भारताच्या कसोटी इतिहासातील धावांच्या फरकाने हा सर्वात मोठा पराभव ठरला आणि फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत पाहुण्यांनी भारताला चारीमुंड्या चित केले.
या मालिकेतील नीरस कामगिरीचा थेट फटका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत बसला असून भारताचा गुणात्मक टक्का घसरून ४८.१५ टक्क्यांवर आला आहे आणि संघ पाचव्या स्थानावर सरकला आहे. पाकिस्तानने आता ५० टक्क्यांसह भारताला मागे टाकत वरचे स्थान मिळवले आहे. या शर्यतीत ऑस्ट्रेलिया शंभर टक्के गुणांसह अव्वल स्थान कायम राखून आहे, तर दक्षिण आफ्रिका या मालिकेतील विजयामुळे दुसऱ्या स्थानी अधिक भक्कम झाली आहे.
पराभवानंतर भारतीय संघाचा नेतृत्वभार सांभाळणाऱ्या ऋषभ पंतने ही स्थिती निराशाजनक असल्याचे मान्य केले. मात्र चुका सुधारून अधिक चांगली कामगिरी करण्याची गरज असल्याचे तो म्हणाला आणि दक्षिण आफ्रिकेने अधिक सक्षम खेळ केला याचे श्रेय त्यांनाच जात असल्याचेही त्याने नमूद केले.
भारताने पहिल्या दोन डब्ल्यूटीसीमध्ये अंतिम फेरी गाठली होती, पण गेल्या काही महिन्यांतील सततच्या अपयशामुळे अंतिम फेरी गाठणे कठीण बनत चालले आहे. घरच्या मैदानावरही अस्थिरता वाढत असून फलंदाजीतील सातत्याचा पूर्ण अभाव, फिरकीचा प्रभाव कमी होणे आणि वारंवार डाव कोसळणे या चिंताजनक बाबींवर आता तातडीने उपाययोजना आवश्यक ठरल्या आहेत. पुढील मालिकांमध्ये नाट्यमय पुनरागमन केल्याशिवाय भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा प्रवास आव्हानांनी भरलेला राहणार आहे.