इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे संस्थापक इम्रान खान यांचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर पसरत आहेत. काही पोस्ट्समध्ये पाकिस्तानी लष्कराने त्यांना विष दिल्याचा दावा देखील करण्यात येत आहे, ज्यामुळे पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इम्रान खान यांना २०२३ मध्ये विविध प्रकरणांत दोषी ठरवून रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मागील काही आठवड्यांपासून कोणालाही इम्रान खान यांना भेटण्यासाठी परवानगी दिलेली नाही. कुटुंबीय, पक्षनेते तसेच अधिकृत प्रतिनिधींनाही भेटण्याची परवानगी दिली जात नसल्याने या अफवांना अधिक खतपाणी मिळत आहे.
तुरुंगाबाहेर शांततापूर्ण धरणे देत असलेल्या इम्रान खान यांच्या बहिणींवर पोलिसांनी अचानक लाठीहल्ला केल्याचा PTI पक्षाचा आरोप आहे. नुरीन नियाझी यांनी पोलिस महासंचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आम्ही कोणताही कायदा मोडला नव्हता. रस्ते अडवले नाहीत. तरीही पथदिवे बंद करुन अंधार करत पोलिसांनी आमच्यावर ठरवून हल्ला केला.”
या घटनेनंतर इम्रान खान यांच्या बहिणीने पंजाब पोलिसांना पत्र पाठवून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी मागील तीन वर्षांत शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर पोलिस अत्याचार वाढल्याचेही नमूद केले.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिनाभरात इम्रान खान यांना भेटण्यासाठी कोणालाही परवानगी मिळालेली नाही. त्यांच्या मृत्यूच्या अफवा इंटरनेटवर फिरत असताना तुरुंग प्रशासनाकडून भेटींवर सुरू असलेली बंदी परिस्थिती अधिकच संशयास्पद बनवत असल्याचे पक्षाचे मत आहे.
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहैल आफ्रिदी यांनीही सलग सात वेळा भेटीचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारल्याचे सांगितले जाते.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील वातावरण तापले असून इम्रान खान यांच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी वाढत आहे.






