वसई : पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वायूच्या सिलेंडरमधून विषारी वायूची गळती झाली. या वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला असून, एकूण १३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वसई पश्चिमेच्या दिवाणमान परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. दक्षता म्हणून महापालिका अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकी समोरील दोन इमारती खाली केल्या आहेत. दिवाणमान परिसरात महापालिकेच्या पाण्याची टाकी आहे.
मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास या पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या क्लोरिनच्या टाकीतून अचानक वायूची गळती सुरू झाली. यामुळे परिसरात वेगाने हिरवा विषारी वायू पसरू लागला. या ठिकाणी दाट नागरी वस्ती असल्याने अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अधिक त्रास असणाऱ्या १३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये स्थानिक नागरिकांसह महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, महापालिका आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी क्लोरिनचा सिलेंडर त्या परिसरातून हटवला आहे. मात्र, वायू विषारी असल्यामुळे बाधित परिसर सील करण्यात आला असून नागरिकांना या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच क्लोरिन वायूची टाकी गास परिसरातील नाल्यात टाकून टाकीची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
अशाप्रकारे झाली विषारी वायुगळती
दिवाणमान येथील पाण्याच्या टाकीतून आसपासच्या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या टाकीचा व्हॉल्व बिघडल्यामुळे पाण्याची गळती सुरू होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्ती ज्या भागात सुरू आहे. त्याच्या मागच्या बाजूस असणाऱ्या खोलीत १० ते १५ वर्ष जुनी क्लोरिन वायूची टाकी ठेवण्यात आली होती. व्हॉल्व दुरुस्तीसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याचा धक्का या टाकीला लागला आणि टाकी जमिनीवर कोसळली. आणि टाकीतून वायू वळती सुरू झाली.