मुंबई : दर मंगळवारी होणारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक २५ नोव्हेंबर रोजी होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ग्रामीण भागात उडालेला धुरळा व निवडणूक प्रचाराला जेमतेम पाच दिवसांचा कालावधी पाहता प्रचारसभांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सत्ताधारी महायुतीमधील तीनही पक्षांचे मंत्री प्रचारात सध्या व्यस्त आहेत. बैठकीकरता एक दिवस मुंबईत मंत्रालयात येणे व पुन्हा जाणे यामध्ये एक दिवसाचा कालावधी जाणार असल्याने ही बैठक रद्द करण्यात आली आहे.






