आजु सफल तपु तीरथ त्यागू, आजु सफल जप जोग बिरागू, सफल सकल सुभ साधन साजू, राम तुम्हहि अवलोकत आजू...अनेक शतकांपासूनच्या या अंतर्गत भावना प्रत्यक्षात समोर आल्या. तपश्चर्येला फळ मिळाले, मन प्रसन्न झाले, श्रद्धा पूर्ण झाली. श्री अयोध्या धाम येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरावर झालेला ध्वजारोहण सोहळा मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करतो, तसेच भारतीयांची श्रद्धा, देशभक्ती आणि सांस्कृतिक मूल्यांची घोषणा आहे. हा क्षण ऐतिहासिक आहे. दीर्घकाळापासून जपलेला संकल्प आता प्रत्यक्ष वास्तुकलेत रूपांतरित झाला. लाखो भक्तांचे स्वप्न आज पूर्ण झाले. ज्यात तपश्चर्या, त्यागाची भावना सामावलेली आहे.
इतिहासात अनेक संघर्ष, साम्राज्यांचे उदय, तसेच साम्राज्ये लोप पावली. श्रीरामाच्या जन्मस्थानासाठी केलेला प्रयत्न न्यायासाठी असण्यासोबत देशाच्या अस्मितेला पुन्हा जागृत करण्यासाठी होता. या शतकानुशतके चाललेल्या प्रयत्नात समाजातील प्रत्येक घटक सामील होता. संन्यासी, संत, पुरोहित, नागा, निहंग, विद्वान, विचारवंत, सामान्य कुटुंब आणि जंगल व गुहांमधील साधक या सर्वांनी जात, पंथ आणि उपासना पद्धतीच्या रेषा ओलांडून स्वतःला प्रभू श्रीरामांच्या चरणी समर्पित केले. अयोध्या धाममध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या या भव्य मंदिरावर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यामधून दीर्घकाळ जोपासलेली भक्ती, संयमी संघर्ष आणि सामूहिक श्रद्धा दिसून येते. विवाह पंचमीचा हा दैवी योग या उत्सवाला आणखी पवित्र करतो. श्रीराम आणि माता जानकी यांचा विवाह झालेला मार्गशीर्ष शुद्ध पंचमी हा दिवस विवाह सोहळा आणि धर्म व निसर्गाच्या समन्वयाचे प्रतीक आहे. हा ध्वजारोहण सोहळा परंपरेला प्रबळ करतो आणि कालातीत संदेश देतो की धर्माचा नेहमी विजयी होतो आणि रामराज्याची तत्त्वे कायम टिकून राहतात. महर्षी वाल्मिकींनी रामायणात म्हटल्याप्रमाणे, 'रामो विग्रहवान धर्म' म्हणजेच प्रभू श्रीराम हे धर्माचे अवतार आहेत. हा ध्वजारोहण फक्त विधी किंवा उत्सव नाही तर ऐतिहासिक टप्पा आहे, जेथे हजारो वर्षांची सांस्कृतिक स्मृती, दशकांपासून न्यायासाठीचा संघर्ष, संतांचे तप, भक्तांचे धैर्य व राष्ट्राचा सामूहिक उत्साह एकत्र येऊन सत्याचा विजय साकारला आहे, धर्माला नवसंजीवनी दिली आहे आणि प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर उभारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम लल्लाच्या भव्य प्राणप्रतिष्ठेपासून अयोध्येने जागतिक स्तरावरून अभूतपूर्व लक्ष वेधले आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत भारत आणि परदेशातून एक कोटीहून अधिक भाविकांनी व पर्यटकांनी अयोध्येला भेट दिली. हॉटेल्स आणि धर्मशाळा पूर्णपणे भरलेल्या आहेत आणि नवीन रोजगार व व्यवसायाच्या संधींच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये जलद वाढ होत आहे. अयोध्या आता श्रद्धेचा आणि आर्थिक विकासाचा सुसंवादी संगम साधत जागतिक सांस्कृतिक राजधानी ठरले. पंतप्रधानांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली अयोध्येची त्रेता युगाप्रमाणे म्हणजेच दिव्य, भव्य आणि अभिनव अशी तुलना केली जात आहे. रस्ते, घाट, मार्ग, सुरक्षा व्यवस्था आणि सार्वजनिक सुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात आला आणि त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, रामपथ, धर्मपथ, भक्तिपथ, जन्मभूमी पथ आणि सरयू नदीच्या किनाऱ्याचे संवर्धन हे या परिवर्तनाचे आधारस्तंभ बनले आहेत. जवळपास ५०,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांमुळे अयोध्येचा कायापालट होत आहे. मोक्षाचे हे शहर आता जगातील पहिले स्मार्ट आध्यात्मिक शहर म्हणून रूपांतरित केले जात आहे. लवकरच सुरू होणारे म्युझियम ऑन टेम्पल्स अयोध्येच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक शिक्षण केंद्रात रूपांतरित करेल. १,४०७ एकर जगेवरील नवीन अयोध्या ग्रीनफिल्ड टाऊनशिपमध्ये २०० एकर हरित जागा, सुपर-स्पेशलिटी आरोग्य केंद्र, भूमिगत उपयुक्तता यंत्रणा आणि वेलनेस हबचा समावेश आहे, जे शहराला भावी स्थिर, पर्यावरणपूरक आध्यात्मिक महानगर म्हणून आकार देत आहे. चाळीस मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प अयोध्येमधील ऊर्जेच्या गरजांची पूर्तता करत आहे. प्रभू श्रीरामाचे व्हर्च्युअल दर्शन, मेटाव्हर्स अनुभव, वैदिक वन आणि हवामान-आधारित व्यवस्थापन यंत्रणा शहराची ओळख अधिक वाढवत आहे. श्रद्धा, संशोधन, संस्कृती, तंत्रज्ञान आणि दूरदर्शी दृष्टिकोन यांना एकत्र करून अयोध्या पवित्र शहर तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील उदयास येत आहे. जगातील हा पहिला धार्मिक बांधकाम प्रकल्प आहे, ज्याला ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलकडून 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' आणि भारताच्या नॅशनल सेफ्टी कॉन्सिलकडून सर्वोच्च सुरक्षा पुरस्कार मिळाला आहे. यामधून निदर्शनास येते की, श्रद्धा आणि भक्तीसोबत जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी आणि सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आले आहे. मंदिर संकुल २.७ एकर जागेवर पसरलेले आहे, ज्यामध्ये सुमारे ५७,४०० चौरस फुटांचे बांधकाम क्षेत्र आहे. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट आणि उंची १६१ फूट आहे. या तीन मजली मंदिरात २० फूट उंचीचे मजले, ३६६ बारकाईने कोरीव काम केलेले स्तंभ (खांब), पाच मंडप, १२ भव्य प्रवेशद्वार आणि अतुलनीय कारागिरीची साक्ष देणारी विशिष्ट नागर-शैलीतील वास्तुकला आहे. मंदिराच्या तळमजल्यावर बालकराम यांचे दर्शन मिळते, तर पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबारचे दिव्य दृश्य पाहायला मिळते. मंदिराच्या तटबंदीमध्ये शेषावतार मंदिर, संत तुळसीदास मंदिर, जटायू आणि खारीचे पुतळे आहेत, तर सप्त मंडपामध्ये महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी वाल्मिकी, अगस्त्य मुनी, निषादराज, माता शबरी आणि माता अहिल्या आहेत. विनासायास आध्यात्मिक अनुभव मिळण्याच्या खात्रीसाठी भक्त-केंद्रित सुविधा काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आल्या आहेत. प्रभू श्रीरामाचे राज्य धार्मिक आदर्श असण्यासोबत त्यामधून मानवता आणि अनुशासन दिसून येते. राज्याचा आधार न्याय आहे, भीती नाही आणि राष्ट्रासाठी शासक नाही तर जनता महत्त्वाची आहे. रामराज्याची ही भावना आजही समाज, धोरणे आणि देशाच्या चारित्र्याला मार्गदर्शन करत आहे. हे मंदिर फक्त दगडी बांधकाम नाही तर त्यामध्ये भक्तांचे संघर्ष, संतांचे तप आणि समाजाचे समर्पण सामावलेले आहे. अयोध्या आता फक्त तीर्थक्षेत्र राहिलेले नाही, तर उत्साहाचे केंद्र बनले आहे. श्रीराम आता फक्त स्मरणीय नाहीत, तर अनुभव आहेत. भारत आता फक्त राष्ट्र नाही, तर राम-केंद्रित संस्कृतीचे जागृत रूप आहे. प्रभू श्रीराम यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठता, देशभक्ती, चारित्र्य आणि नीतिमत्ता या आदर्शांपासून प्रेरणा घेत राहिल्यास मानवी संस्कृती अधिक समृद्ध होईल. हे मंदिर भक्तीचे केंद्र असण्यासोबत जीवनाचा दीपस्तंभ आहे, जो भावी पिढ्यांना आठवण करून देतो की धर्म केवळ उपासनेचा विधी नाही, तर आचरणाचा दृष्टिकोन आणि समाजाचा आधार आहे. - योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश






