सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे
आता महाराष्ट्रात सगळीकडे थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारे, पचायला सोपे आणि अत्यंत पोषक असे सुरण, रताळे, आळू यांसारखे कंद आजी–आजोबांच्या काळापासून आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
या पदार्थाची खासियत म्हणजे त्यातील साधेपणा आणि घरगुती चवीत दडलेली पारंपरिक शान. फोडणीचा सुगंध, गुळ–चिंचेची हलकी आंबट–गोड चव, आणि उकडलेल्या कंदमुळांचा मऊसर पोत—हे सगळं मिळून हा पदार्थ थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णता देणारा आणि मनाला समाधान देणारा खरा हिवाळी आनंद बनतो. पौष्टिक खाण्याची आणि पारंपरिक चवीची सुंदर सांगड घालणारे हे कालवण म्हणजे आपल्या मातीतल्या पाककलेचा सुगंधी वारसा. गरमभाकरीसोबत ते अजूनच खुलून येते!
(सुरण, रताळे, आळू – हिवाळी पारंपरिक खास) साहित्य (४ जणांसाठी) :
सुरण - अर्धा कप (उकडून चौकोनी तुकडे) रताळे - अर्धा कप (उकडून तुकडे) आळू (अळकुड्या) - अर्धा कप (उकडलेले), कांदा - १ (बारीक चिरलेला) कढीपत्ता - ७-८ पाने, हिरव्या मिरच्या - २ (चिरलेल्या), लसूण - ५ पाकळ्या (ठेचलेल्या), मोहरी - अर्धा टीस्पून, जिरे -अर्धा टीस्पून, हळद -अर्धा टीस्पून, लाल तिखट - १ टीस्पून, गूळ - १ टीस्पून, चिंच - १ टीस्पून (पाणी काढलेले), दही - अर्धा टेबलस्पून, तेल - २ टेबलस्पून, मीठ - चवीनुसार, कोथिंबीर - २ टेबलस्पून
कृती : सुरण, रताळे आणि आळू तुकडे कापा आणि वेगवेगळे उकडून घ्या. कढईत तेल गरम करा. मोहरी, जिरे टाका. फुटले की कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि लसूण घाला. आता चिरलेला कांदा घालून किंचित सोनेरी होईपर्यंत परता. आता हळद आणि लाल तिखट घाला. छान परतून त्यात दही घाला. दोन मिनिटाने उकडलेले सुरण-रताळे-आळू तुकडे घाला. हलक्या हाताने मिश्रण परता. अर्धा कप गरम पाणी घाला. गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ टाका. झाकण ठेवून मंद आचेवर ८-१० मिनिटे शिजू द्या.वरून कोथिंबीर घाला. कालवण जरा घट्ट असलं की अगदी परफेक्ट झाले समजावे!
सर्व्हिंग टिप्स : गरम ज्वारी/बाजरी भाकरीसोबत अप्रतिम लागते. बाजूला लसूण ठेचा आणि कांदा–लिंबू दिल्यास चव दुप्पट होते. ताटात सर्व्ह करताना वरून १ टीस्पून तूप टाकले तर उत्तमच. थंडीमध्ये उष्णता देणारी, फायबर, विटॅमिन आणि मिनरल्सने भरलेली, उकडलेल्या कंदमुळे पचायला सोपी तुम्ही नक्की करून बघा!






