हजारो लोक बेघर; ९० जणांचा मृत्यू
हनोई : गेल्या काही आठवड्यांपासून व्हिएतनाममध्ये सातत्याने मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. व्हिएतनामच्या राष्ट्रीय हवामान विभागाने भूसख्यलन, पूराचा धोका वाढण्याचा इशारा दिला आहे. सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनेक लोक पूरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
मुसळधार पावसाचा लाखो लोकांना फटका
मीडिया रिपोर्टनुसार, या मुसळधार पावसामुळे व्हिएतनामध्ये अनेक घरे, रस्ते पाण्याखाली गेली आहेत. अंदाजे १,८६,००० लोकांना याचा फटका बसला आहे. अनेक गुरुढोरे देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. आतापर्यंत देशाचे २ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच ९० लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आपत्तींचा धोका वाढला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ऑक्टोबरपासून व्हिएतनामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यापूर्वी बुआलोई वादळ आणि रगासा वादळाने देखील प्रचंड कहर माजवला होता. अनेक लोक छतांवर अडकले आहेत. परिस्थिती अत्यंत भयानक आहे.
या मुसळधार पावसामुळे लोकांनी व्हिएतनामसाठी बुक केलेली तिकीट्स, हॉटेल्स सर्वकाही रद्द केले आहे. यामुळे व्हिएतनामचे अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या बाधित प्रदेशांमध्ये मदत पोहचवण्याचे काम सुरु आहे. पुरामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती आहे. लोकांना मदत पुरवठा करण्यात अडथळा येत आहे. पण सरकाने बचाव संस्था आणि अग्निशमन दलाला लोकांपर्यंत आवश्यक ती मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या परिस्थिती इतकी भंयकर आहे की लोकांना १९९३ च्या पुराची आठवण होत आहे. पण यंदाची परिस्थिती त्याकाळापेक्षा देखील अधिक बिकट असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर लोकांना अन्न संकटाचा देखील सामना करावा लागेल असे स्थानिक माध्यामंनी सांगितले आहे. सध्या पूर आणि भूस्खलनामुळे लोकांच्या स्थलांतराचे कार्य सुरु आहे.






