पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची धावपळ सुरू असते. चालू गाडी पकडण्याची घाई अनेकदा जीवघेणे प्रसंग ओढवून आणते. विशेषतः गर्दीच्या वेळेत पाय घसरून पडण्याच्या आणि प्लॅटफॉर्म–गाडीच्या फटीत अडकण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. अशाच एका धोकादायक प्रसंगातून एका व्यक्तीला वाचवण्यात लोणावळा स्थानकातील RPF जवानांना यश आले आहे.
लोणावळा रेल्वे स्टेशनवर २३ नोव्हेंबर रोजी चेन्नई एक्स्प्रेस सुटत असताना एसी कोचमधील प्रवासी श्रुंग गुप्ता गाडीमध्ये चढण्याच्या घाईत तोल गमावून थेट प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या जागेत घसरून अडकले. काही सेकंदांचा विलंब झाला असता मोठी दुर्घटना घडली असती.
पण ड्युटीवर असलेले RPF सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र मोहन आणि निरीक्षक विपिन कुमार यांनी क्षणाचाही विचार न करता धाव घेत गुप्ता यांना बाहेर खेचून सुरक्षित स्थळी आणले. या जलद प्रतिसादामुळे त्यांचा जीव वाचला. विपिन कुमार यांच्या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे, गुप्ता यांचा केवळ आठ दिवसांपूर्वी विवाह झाला होता. पत्नीसमवेत पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी ते निघाले होते. परंतु घडलेल्या या प्रसंगाने त्यांना चांगलाच धक्का बसला. “गाडी पकडताना पाय घसरला आणि मी थेट खाली घुसत होतो… पण RPF म्हणजे जणू विठू माऊलीच मदतीला आली," असे म्हणत त्यांनी जवानांचे मनापासून आभार मानले.






