दरवर्षी ११ लाख रुपयांची होणार बचत
मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून पर्यावरणपूरक विजेचा वापर करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी कस्तुरबा रुग्णालयाच्या सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात येणार आहे. याठिकाणी १३० किलो व्हॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाव्दारे निर्माण होणाऱ्या विजेचा वापर रुग्णालय इमारतीच्या अंतर्गत वापरासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या विद्युत बिलाच्या खर्चामध्ये बचत होणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पामधून वार्षिक सरासरी १.४०,००० युनिट्स इतकी विद्युत उर्जा निर्माण होवून वार्षिक ११ लाख २० हजार रुपयांची आर्थिक बचत होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या मालकीचे कस्तुरबा हे विशेष रुग्णालय आहे. सुमारे ५१५ खाटांचे हे आशिया खंडातील सर्वात मोठे संसर्गजन्य रोगावरील रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये कावीळ, डेंग्यू, मलेरिया, गोवर, चिकनगुनिया इत्यादी आजारांवरील उपचार केले जातात. कस्तुरबा रुग्णालयात १४८ बेडची क्षमता असलेल्या इमारतीमध्ये पीसीआरलॅब, विलिगीकरण कक्ष, टीबीलॅब, यांचा समावेश आहे. या इमारतीचा एकूण विद्युत भार (कनेक्टेड लोड) ४५० केव्ही एवढा आहे. या इमारतीच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी एकूण सुमारे ११४० चौ. भी. इतके क्षेत्रफळ उपलब्ध आहे.
त्या अनुषंगाने छतावर सौर पॅनेल बसवून अंदाजे एकूण १३० केव्ही क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी विजय इंजिनिअरींग अँड मशिनरी कंपनीची निवड करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यांत्रिक आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वर्षाला १ लाख ४० हजार युनिट एवढी ऊर्जा निर्माण होवून रुग्णालयाच्या विजेच्या खर्चात वर्षाला ११ लाख २० हजार एवढी बचत अपेक्षित आहे.






