Monday, November 24, 2025

वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंना धक्का

वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंना धक्का

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या होमपिचवरच अनपेक्षित धक्का बसला आहे. वाई नगरपालिका निवडणुकीत झालेल्या अचानक घडामोडींमुळे शिवसेनेचा उमेदवार बाद झाला असून संबंधित नेत्याचे पदही गेल्याने पक्षात खळबळ माजली आहे.

वाई नगरपालिकेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांनी त्यांच्या भावाला, प्रवीण शिंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणी विकास शिंदे यांनी भावाला उमेदवारी मागे घ्यायला सांगितल्याने परिस्थिती एकदम बदलली. हा निर्णय कोणालाही विश्वासात न घेता घेतल्याचा आरोप करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी विकास शिंदे यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे उमेदवारही बाद झाला आणि उपजिल्हाप्रमुखांचे पदही गमावले.

घडलेल्या या प्रकारानंतर विकास शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांकडून उमेदवारीबाबत कोणतीही सूचना न मिळाल्याने शेवटच्या दोन मिनिटांत एबी फॉर्म मागे घेतल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अनेक वेळा संपर्क साधूनही पक्षाकडून स्पष्ट भूमिका न आल्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबर विकास शिंदे यांनी जिल्हाप्रमुख रणजित भोसले यांच्यावर गंभीर आरोप केले. वाई तालुक्यात राहूनही इतर पक्षांशी अधिक संपर्क साधणे, टार्गेट करणे, विरोधात बातम्या छापून आणणे आणि कोणतीही नवीन शाखा उभी न करणे अशा अनेक गोष्टींसाठी त्यांनी भोसले यांना जबाबदार ठरवले. वाईतील या नाट्यमय घटनांमुळे निवडणूक रणधुमाळीत नवीन घडामोडींची भर पडली आहे आणि शिवसेनेसमोर प्रश्न उभा राहिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >