Saturday, November 22, 2025

चिमणीची गोष्ट...

चिमणीची गोष्ट...

एक होती चिमणी ती एका झाडावर राहायची. तिचा शेजारी होता कावळा. तो होता थोडासा बावळा. काव काव करायचा अन् चिमणीला त्रास द्यायचा. चिमणी गेली कंटाळून, आली कावळ्याला दम देऊन, तरी कावळ्याच्या खोड्या चालूच. नको नको त्या करामती सुरूच. कधी चिमणीचं खाणं पळव, कधी तिचं घरटंच हलव, रोजच्या त्रासाला करायचं काय. कावळ्याचा बंदोबस्त करायलाच हवा. मग कावळ्याची तक्रार घेऊन चिमणी गेली गरुड राजाकडे. पक्षीराज गरुड बसले होते छान. कोकिळेचे सुरू होते तिथे गान. चिमणीला बघताच पोपट म्हणाला, चिमणे परवानगी घेऊन आत ये. तशी चिमणी पोपटावरच भडकली. म्हणाली पोपटा प्रधान झालास म्हणून इथं मजा करतोस. तिकडे कावळ्याने मला नको केलंय त्याचं तुम्हाला काय पडलंय अन् चिमणी हमसून रडू लागली. रडता रडता सांगू लागली. गरुड महाराज म्हणाले, चिमणे सांग तुझे गाऱ्हाणे योग्य तो न्याय तुला मिळेल. तुला त्रास देणारा शिक्षेस पात्र ठरेल. मग चिमणी म्हणाली, महाराज महाराज कावळ्याचा बंदोबस्त लगेच करा. तो नाही पाळत शेजारधर्म रोज करतो वाईट कर्म. काव काव करून हैराण करतो रोज, मोठेपणाचा आहे त्याला भरपूर माज. माझ्या घरट्याची करतो नासधूस, इतर पक्ष्यांना लावतो फूस. मग मी जगावे तरी कसे? माझ्या जीवनाचे झाले हसे. चिमणी पुन्हा रडू लागली, तिच् तोंड झालं खूपच कडू. हा सारा प्रकार बघून पक्षीराज म्हणाले आणा कावळ्याला पकडून ! मग चार-पाच सैनिक गेले पटकन कावळ्याला धरून आणले. चटकन चिमणी विरुद्ध कावळा राजवाड्यात सुरू झाला खटला. चिमणीने चिवचिव करीत आपली बाजू मांडली. कावळ्याने काव काव करून सारी सभा मोडली. कावळ्याच्या करामती बघून सारेच गेलेत थिजून, बिचारी चिमणी गेली दमून. मग राजाने निर्णय घेतला, कावळा आहे दोषी द्यावे त्याला फाशी. फाशीचे नाव ऐकताच कावळा घाबरला रडू लागला, जमिनीवर लोळू लागला. माफ करा, माफ करा असं म्हणू लागला. तसा सैनिकांनी त्याला चांगलाच धरला. कावळ्याला बघून चिमणीला आली दया, कावळ्याची गेली होती रया. चिमणी म्हणाली पक्षीराज कावळ्याला झालाय पश्चाताप, एवढी मोठी शिक्षा नको थोडी द्या त्याला समज. चिमणीचे मोठे मन बघून कावळ्याचे हृदय आले भरून. कावळा म्हणाला, चिऊताई तुझं मन केवढं मोठं माझं मन मात्र आहे किती छोटं! तू माझा जीव वाचवलास जरी मी तुला त्रास दिला, आता मीच तुझा भाऊ यापुढे आपण दोघे एकत्र राहू. सगळ्यांचे करू मनोरंजन मग राजाने चिमणीला दिली एक छान भेट, तिने ती दिली कावळ्याला थेट. तेव्हापासून कावळा चिमणी राहतात एकत्र छोट्या-छोट्या मुलांचे करतात रंजन. एक होती चिऊ आणि एक होता काऊ, संपली माझी गोष्ट आता मी जाऊ !

Comments
Add Comment