Saturday, November 22, 2025

आत्महत्या

आत्महत्या

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

माझ्या लहानपणी मला माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट कायमची मनावर कोरली गेली आहे. साधारण चाळीस वर्षांपूर्वी, वर्तमानपत्र वाचताना ती आम्हा मुलींना म्हणाली की, आज एक चमत्कारिक बातमी वाचली. ती बातमी म्हणजे चायनामध्ये एका बाईला आपले जीवन संपवावेसे वाटले. सरळ शब्दात सांगायचे म्हणजे तिला आत्महत्या करावीशी वाटली. ती घराच्या गॅलरीत आली आणि तिथून तिने उडी मारली. उडी मारल्यावर ती आत्महत्या करणारी बाई, खालून डोक्यावर केळ्याची पाटी घेऊन, केळी विकायला जाणाऱ्या एका केळीवालीच्या टोपलीवर पडली. ती तिथे पडताच नरम आणि काहीशा चिकट केळ्यांच्या मध्ये तिचे शरीर पक्के बसले आणि चक्क ती वाचली. तिच्या कोणत्याही अवयवाला इजा झाली नाही. जिच्या डोक्यावर केळ्याची जड पाटी होती ती डोक्याला इजा होऊन ताबडतोब मरण पावली.

ही बातमी आम्हाला ऐकवल्यावर आई म्हणाली, “देव तारी त्याला कोण मारी?” आम्हालाही तोच भास झाला; परंतु ती पुढे असेही म्हणाली, “या घटनेला आपण ‘खून’ असेही म्हणू शकतो. एका निष्पाप माणसाचा तिने निष्कारण जीव घेतला.” हे तिने सांगितल्यावर मी माझ्या आयुष्यात समोर आलेल्या कोणत्याही घटनांचा दोन्ही बाजूने विचार करायला शिकले! त्या बाईला ‘आपण वाचलो’, असे जरी वाटले असेल तरी तिच्याकडून अप्रत्यक्षपणे ‘खून’ झालेला आहे ही गोष्ट मी कायमची लक्षात ठेवली आहे.

असे म्हटले जाते की, जगातल्या प्रत्येक माणसाला आयुष्यात कधीतरी आत्महत्येचा विचार नक्की शिवून जातो. या विचाराला दूर करण्याची सदसद् विवेकबुद्धी ही शिक्षण, संस्कार आणि अनुभवातून प्राप्त होते. म्हणूनच माणूस या वाईट विचारापासून दूर लोटला जातो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेश (WHO)नुसार दरवर्षी जगभरात सुमारे दहा लाख माणसे आत्महत्या करतात आणि त्यामुळे मरतात. याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे दहा लाखांच्या साधारण दहा ते वीस टक्के जास्त लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात!

त्यातही दुःखदायक गोष्ट म्हणजे वय वर्ष पंधरा ते साधारण पस्तीशीपर्यंतची माणसे यात जास्त आहेत. नेमक्या काय समस्या या माणसांना असू शकतात असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येते की, पंधरा-सोळा या वयोगटातील शाळकरी मुले, शाळा सोडून कॉलेजकडे पदार्पण करणारी असतात किंवा या काळात शाळा-कॉलेज सोडणारी मुलेसुद्धा आढळतात. शिक्षणात गती नसणे किंवा दारू-ड्रग्स इत्यादींकडे त्यांची कदाचित वाटचाल सुरू झालेली असते, शिक्षणासाठी, व्यसनासाठी तसेच शौक पूर्ण करण्यासाठी आर्थिक चणचण किंवा सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रेमात अपयश!

राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) यांनी अलीकडेच एक आकडेवारी समोर आणली. त्यानुसार भारतात दरवर्षी सव्वा लाखांच्या आसपास माणसांनी आत्महत्या केली आणि ते त्यात सफल झाले म्हणजे मेले; परंतु साधारण चार लाख लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यातून ते वाचलेले आहेत. याचा अर्थ दर एक तासाला पंधरा आत्महत्या झाल्याचे निदर्शनास आले. अनेक वर्षांचा आलेख पाहता आत्महत्येत दरवर्षी वाढ होत आहे, हे खूप दुःखदायक आहे.

१० सप्टेंबर या दिवशी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन (WSPD) साजरा केला जातो. WHO ही संस्था १० सप्टेंबर या दिवसाचे सह-प्रायोजक असते. या दिवसाचा उद्देश  जगभरात आत्महत्या रोखता येऊ शकतात, याबाबत जागरूकता निर्माण करणे आहे! २०२४-२०२६ या वर्षासाठी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त जगभरात ‘Changing the narrative of suicide’ ही घोषणा तयार केली गेली आहे. या थीमचा उद्देश लक्षात घेऊन आपल्या आसपासच्या, आपल्या कुटुंबातील माणसांच्या वागण्या-बोलण्यात, व्यवहारात काही फरक जाणवतोय का? हे लक्षात घेऊन आपण जागरूकपणे त्याच्या जवळ जाऊन त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे!

आत्महत्या प्रतिरोधक संस्थेत काम करणाऱ्या तज्ज्ञ माणसांना बोलवून शाळा-कॉलेज तसेच इतर संस्थांनी त्यांचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत! सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘आत्महत्या प्रतिबंधक दिन’ साजरा करायची वेळ कोणावरही न येवो, अशी उपाययोजना व परिस्थिती निर्माण करायची आजच्या काळची महत्त्वाची गरज आहे! चला, चांगली सुरुवात आपण स्वतःपासूनच करूया!

Comments
Add Comment